रेसर बाईकवरून रिल्स बनवणे पडले महागात; पोलिसांनी तब्बल 'इतक्या' हजारांचा ठोठावला दंड (संग्रहित फोटो)
सिन्नर : नाशिक-पुणे महामार्गावर सिन्नर महाविद्यालयासमोर रेसर बाईकच्या माध्यमातून स्टंटबाजी करत रिल्स बनवले जात होते. हे रिल्स बनवणाऱ्या दोन तरुणांना वाहनांसह ताब्यात घेत सिन्नर पोलिसांनी त्यांना तब्बल 19 हजारांचा दंड ठोठावला. दोन्ही तरुणांना ही स्टंटबाजी चांगलीच महागात पडली. पोलिसांनी अशाप्रकारे कारवाई केल्याने तरुणांना चांगला फटका बसला.
सिन्नर महाविद्यालयासमोर रविवारी (दि.८) दुपारी १२ वाजेच्या सुमारास दोन रेसर बाईकच्या माध्यमातून प्रसाद दत्तात्रय गवळी (वय २१, रा. नायगाव) हा (एमएच ०१ डीजे ६२०४) तर मिलींद पाटील (वय २३, रा. उद्योग भवन, सिन्नर) हा (एमएच १९ ईके ४४५७) हे दुचाकी जोराने चालवून सिन्नर महाविद्यालयासमोर स्टंटबाजी करत त्याचे रिल्सही बनवत होता. याच वेळी सिन्नर पोलीस ठाण्याचे गस्तीपथक या महामार्गावरून जात असताना त्यांच्या ही बाब लक्षात आली. पोलीस निरीक्षक हेमंतकुमार भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार समाधान बोराडे, गणेश वराडे, रविंद्र चिने, नितीन डावखर, कृष्णा कोकाटे यांनी या स्टंटबाजी करणाऱ्या दुचाकींचा पाठलाग करत आडव्या फाट्यावर दोनही तरुणांना ताब्यात घेतले.
हेदेखील वाचा : Ahilyanagar Crime: “बोलली नाहीस तर मारून टाकीन” एकतर्फी प्रेमातून कोयत्याने प्राणघातक हल्ला; नृत्यांगना गंभीर जखमी
दरम्यान, ही वाहने सिन्नर पोलीस ठाण्यात आणत वाहन परवाना जवळ न बाळगणे ५ हजार रुपये, नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होईल, अशा पद्धतीने रेस ड्राईव्ह करणे २ हजार रुपये, दुचाकीचा विमा नसणे २ हजार रुपये आणि नंबर प्लेट नसल्याने ५०० रुपये याप्रमाणे प्रत्येकी ९५०० रुपयांचा ई-चलन मशीनद्वारे ऑनलाईन दंड ठोठावण्यात आला.
15 दिवसांत दंड भरणे गरजेचे
१५ दिवसांत हा दंड भरणे अपेक्षित आहे. रस्त्यावर वाहने पार्किंग करून वाहतुकीस अडथळा होईल, असे कृत्य केल्याने पोलिसांनी दुचाकी, रिक्षा, पिकअप, कार, छोटा हत्ती अशा तब्बल ५५ वाहनांवर १८ हजार रुपयांचा ऑनलाईन दंड ठोठावला आहे.
हेदेखील वाचा : Pune Crime: धक्कादायक! 15 वर्षीय मुलीने घरातच दिला बाळाला जन्म; प्रसूती करून स्वतः कापली नाळ






