Establishment of 'Department of Sustainable Energy Engineering' at IIT Kanpur, becomes first IIT

‘आयआयटी कानपूर’च्या गव्हर्नर बोर्डाचे अध्यक्ष डॉ. के. राधाकृष्णन म्हणाले, की या क्षेत्रात शैक्षणिक विभाग सुरू करणे हा देशातील शैक्षणिक व तंत्रज्ञान विकासासंबंधित गरजा भागविणारा महत्वाचा उपक्रम आहे. कोरोनाच्या साथीमुळे उद्भवलेल्या अडथळ्यांनाही न जुमानता हा टप्पा गाठल्याबद्दल त्यांनी संस्थेचे कौतुक केले.

मुंबई : ‘आयआयटी कानपूर’ (IIT Kanpur) या देशातील प्रमुख संस्थेने प्रारंभापासूनच अनेक दूरदर्शी शिक्षणाचे व संशोधनाचे उपक्रम राबविले आहेत. सामाजिक महत्त्व असलेल्या भविष्यकालीन क्षेत्रांची ओळख करुन देण्याचा आपला समृद्ध वारसा पुढे चालू ठेवून, या संस्थेने आता ‘शाश्वत ऊर्जा अभियांत्रिकी विभाग’ (Department of Sustainable Energy Engineering) तयार करण्याच्या दिशेने एक पाऊल उचलले आहे. त्यायोगे उच्च गुणवत्तेच्या वैज्ञानिक व तांत्रिक ज्ञानाच्या निर्मितीद्वारे व मनुष्यबळाच्या आधारे देशात वाढ होत असलेल्या स्वच्छ व अपारंपरीक उर्जेच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देण्याचे संस्थेचे उद्दिष्ट आहे. आयआयटी कानपूरचे संचालक प्रा. अभय करंदीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आयआयटी कानपूरच्या गव्हर्नर बोर्डाने ७ डिसेंबर २०२० रोजी झालेल्या बैठकीत या प्रस्तावाला मान्यता दिली आहे.

‘आयआयटी कानपूर’च्या गव्हर्नर बोर्डाचे अध्यक्ष डॉ. के. राधाकृष्णन म्हणाले, की या क्षेत्रात शैक्षणिक विभाग सुरू करणे हा देशातील शैक्षणिक व तंत्रज्ञान विकासासंबंधित गरजा भागविणारा महत्वाचा उपक्रम आहे. कोरोनाच्या साथीमुळे उद्भवलेल्या अडथळ्यांनाही न जुमानता हा टप्पा गाठल्याबद्दल त्यांनी संस्थेचे कौतुक केले. प्रा. करंदीकर यांनी नमूद केले, “२०३० पर्यंत स्वच्छ आणि शाश्वत उर्जा स्त्रोतांकडून कमीतकमी ४० टक्के ऊर्जा घेण्याचे भारत सरकारने पॅरिस करारामध्ये आश्वासन दिले आहे. त्या दृष्टीने, आमचा हा उपक्रम अगदी वेळेत सुरू होत आहे.” प्रा. करंदीकर पुढे म्हणाले की, वीज व परिवहन यांसारख्या विविध क्षेत्रांवर परिणाम करणारे अपारंपरीक ऊर्जेचे तंत्रज्ञान व्यापकपणे स्वीकारले जावे, यासाठी जागतिक स्तरावर अग्रगण्य होण्याच्या भारताच्या प्रयत्नांत या नवीन विभागाने योगदान द्यावे, असाही आमचा उद्देश आहे.

वर नमूद केलेल्या राष्ट्रीय आकांक्षांच्या अनुषंगाने, या नवीन विभागात पदवीपूर्व व पदवी या दोन्ही स्तरांवर उच्च प्रतीचा अभ्यासक्रम विकसित करण्याची संकल्पना मांडण्यात आली आहे. ‘आयआयटी-के’चे संचालक प्रा. करंदीकर म्हणाले की, नवीन विभागाच्या शैक्षणिक अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांना अनेक कौशल्य-संच उपलब्ध करुन देण्याचे उद्दिष्ट असेल. यामध्ये अभियांत्रिकीतील मूळ विभाग आणि विज्ञान व मानवता यांच्या संयोगाने विशेष अभ्यासक्रम तयार करण्यात येतील. या अभ्यासक्रमांमधून विद्यार्थ्यांना एक सर्वंकष ऊर्जा अभियंता होण्याचे प्रशिक्षण मिळेल आणि हे अभियंते उद्योग तसेच शैक्षणिक संस्था व संशोधन संस्था यांच्यासाठी उपयुक्त ठरतील.

याशिवाय, नवीन, अपारंपरीक व वैकल्पिक ऊर्जा तंत्रज्ञानावर स्पष्टपणे लक्ष केंद्रित करून उर्जेच्या शाश्वतपणाशी संबंधित सीमांत आणि भविष्यकालीन क्षेत्रातील संशोधनांमध्ये हा विभाग गुंतलेला असेल. प्रा. करंदीकर म्हणाले, “या नव्या विभागात होणारे संशोधन हे उर्जा संकलन व निर्मिती, उर्जा संग्रहण व वितरण, पर्यायी इंधन तसेच ऊर्जा, पर्यावरण आणि धोरण या चार प्रमुख क्षेत्रांमध्ये वर्गीकृत केले जाईल. सरकारच्या मेक इन इंडिया, स्किल इंडिया, स्वच्छ भारत व आत्मनिर्भर भारत यांसारख्या महत्त्वाच्या योजनांच्या अनुषंगाने, या नवीन विभागात होणाऱ्या संशोधनांचे निष्कर्ष स्वदेशी तंत्रज्ञानाचा विकास, नमुना उत्पादन आणि व्यावसायिकीकरण यांच्यामध्ये रुपांतरीत करण्यात येतील.’’ नवीन विभागाशी संबंधित कामांचा समन्वय साधणारे प्रा. आशिष गर्ग म्हणाले, “सौर, पवन व इतर स्वच्छ संसाधनांतून उर्जा निर्मिती; बॅटरी व सुपरकपॅसिटर; ऊर्जा संग्रहण व वितरण; स्मार्ट ग्रिड्स; कार्बन कॅप्चर; स्वच्छ पर्यायी इंधन; कचऱ्यापासून उर्जानिर्मिती; स्वच्छ पाणी; आणि ऊर्जा धोरण व अर्थशास्त्र यांवर भर देणारे संशोधन नव्या विभागात सुरू होईल. हा विभाग जसजसा वाढेल व परिपक्व होत जाईल, तसतशी येथील संशोधनांची व्याप्ती नवीन क्षेत्रांमध्येही वाढेल.’’

गेल्या दशकात ‘आयआयटी कानपूर’ने जगातील अनेक आघाडीच्या संस्थांसह लक्ष्यित सहयोग आणि संयुक्त कार्यक्रमांसाठी जागतिक संपर्क साधण्याच्या प्रयत्नांत बरीच प्रगती केली आहे. उर्जा क्षेत्रातील अशाच एका उपक्रमात अमेरिकेतील ‘राईस युनिव्हर्सिटी’शी केलेल्या भागीदारीचा समावेश आहे. या उपक्रमात, एक सहकारी संशोधन केंद्र तयार होईल; जे नवीन विभागाचा एक भाग असेल. हा नवा विभाग अशा आघाडीच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विद्यापीठांसह सहयोग करीत राहील व मोठ्या प्रमाणात परिणाम साध्य करण्याचे ध्येय बाळगील.

शैक्षणिक आणि संशोधन कार्यक्रमांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी आवश्यक अत्याधुनिक प्रयोगशाळा तयार करण्यासाठी हा विभाग आर्थिक संसाधने एकत्र करेल आणि विविध सरकारी व स्वयंसेवी संस्थांशी करार करेल. या मोहिमेमध्ये, अमेरिकास्थित ‘मेहता फॅमिली फाउंडेशन’ने नवीन विभाग स्थापनेसाठी मदत केली आहे. ‘फाउंडेशन’चे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल मेहता यांनी नवीन विभागाच्या स्थापनेबद्दल संस्थेचे अभिनंदन केले आणि म्हटले, की भविष्यातील उर्जेची आवश्यकता लक्षात घेता, हा विभाग सुरू करणे हे भारतासाठी एक योग्य पाऊल ठरले आहे. मेहता पुढे म्हणाले, ‘’या महत्त्वपूर्ण प्रवासामध्ये आपले फाऊंडेशन नव्या विभागाशी भागीदारी करेल. हा विभाग व राईस-आयआयटी-केचे सहयोगात्मक संशोधन केंद्र या दोन्ही संस्था शाश्वत उर्जेच्या क्षेत्रात नवीन आयाम स्थापित करतांना बघायला आपल्याला आवडेल. देशातील पुढच्या पिढीला या क्षेत्रात काम करण्यासाठी प्रेरणा या कामातून मिळेल.