फोटो सौजन्य - सोशल मीडिया
चिपळूण (प्रतिनिधी):– चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार शेखर निकम यांच्या प्रचारार्थ मंगळवार दिनांक ५ रोजी सकाळी ११ वाजता पोफळी नाका येथे सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेच्या माध्यमातून पोफळी जिल्हा परिषद गटात निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाणार आहे. या सभेला राज्याचे उद्योग मंत्री तथा पालकमंत्री तसेच शिवसेना नेते ना. उदय सामंत यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
महायुतीतर्फे चिपळूण – संगमेश्वर विधानसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाला जागा सुटली असून महायुतीतर्फे शेखर निकम यांना उमेदवारी मिळाली आहे. सोमवारी सकाळी चिपळूण शहरात चिपळूणचे ग्रामदैवत श्री जुना कालभैरवाचे दर्शन घेऊन व श्रीफळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. तर आता ग्रामीण भागाकडे देखील लक्ष देण्यात आले असून प्रचाराचा नारळ फोडला जाणार आहे.
या अनुषंगाने महायुतीचे उमेदवार आमदार शेखर निकम यांच्या प्रचारार्थ पोफळी नाका येथे सकाळी ११ वाजता राज्याचे उद्योग मंत्री तथा पालकमंत्री शिवसेना नेते ना. उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती पोफळी पंचायत समिती गणाचे माजी सदस्य बाबू साळवी यांनी दिली. पोफळी गणामध्ये आमदार शेखर निकम यांच्या माध्यमातून नळ पाणी योजनासह रस्ते पाखाडी यांसारख्या विकास कामांना निधी देखील मिळाला असल्याची माहिती श्री. साळवी यांनी यावेळी दिली. यामुळे पोफळी गणातील मतदार बंधू-भगिनी आमदार निकम यांच्या पाठीशी उभे राहतील, असा विश्वास देखील यावेळी व्यक्त केला.
या सभेला महायुतीचे उमेदवार आमदार शेखर निकम यांच्यासह माजी आमदार सदानंद चव्हाण, भाजप नेते, माजी आमदार वसंत ताम्हणकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माजी सभापती शौकत मुकादम, प्रदेश सरचिटणीस जयंद्रथ खताते, ज्येष्ठ नेते जिल्हा नियोजन मंडळ सदस्य दादा साळवी, चिपळूण तालुकाध्यक्ष नितीन ठसाळे, माजी जिल्हा परिषद सदस्य सौ. दिशा दाभोळकर, भाजप चिपळूण तालुकाध्यक्ष वसंत ताम्हणकर, शिवसेनेचे तालुकाप्रमुख संदेश आयरे, माजी उपसभापती सूर्यकांत खेतले, शिरगाव सोसायटी चेअरमन जयंतराव शिंदे, कोंडफनसवणे माजी सरपंच मधुकर इंदुलकर, ज्येष्ठ नेते किसन पवार, डॉ. शिवाजी मानकर, राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी तालुकाध्यक्षा सौ. जागृती शिंदे, वैभव पवार, शिरगावचे माजी सरपंच अनिल शिंदे, पोफळी सरपंच उस्मान सय्यद, माजी उपसरपंच अब्दुला सय्यद, पोफळी ग्रामपंचायत सदस्य संजय बामणे, कुंभार्ली सरपंच रवींद्र सकपाळ, निलेश कोलगे, पोफळी ग्रामपंचायत माजी सदस्य रवींद्र पंडव, सुरेश घाणेकर, इब्राहिम सय्यद, तसेच पोफळी गणातील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य याचबरोबर महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. तरी मतदार बंधू भगिनींनी या सभेला उपस्थित रहावे असे आवाहन बाबू साळवी यांनी केले आहे.