महापालिका निवडणुकीत कसा असेल महायुतीचा फॉर्म्युला?, चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगूनच टाकला प्लान
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीचा निकाल जाहीर झाली आहे. एकतर्फी निकाल लागल्यानंतर देखील महायुतीकडून सत्ता स्थापनेचा दावा केला गेला नाही. यावरुन राजकारण रंगले आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला असून सध्या ते राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून कारभार पाहत आहेत. यामध्ये आता त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा दावा देखील सोडला आहे. दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.
महायुतीला विधानसभा निवडणुकीमध्ये बहुमतापेक्षाही अधिक मताधिक्य आहे. फक्त भाजपाने 132 जागा जिंकल्या आहेत. तरी देखील महायुतीला अद्याप मुख्यमंत्रीपदाचा निर्णय घेता आलेला नाही. भाजप पक्षश्रेष्ठी व दिल्लीतील नेते हे मुख्यमंत्रिपदाचा निर्णय घेणार आहेत. दरम्यान, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “आम्हाला अद्याप तरी तसा काही निरोप आलेला नाही”. तसेच यावेळी त्यांना विचारण्यात आलं की युतीचं सरकार स्थापन करायला, मुख्यमंत्रीपदाचा निर्णय घ्यायला महायुतीला इतका वेळ का लागतोय? त्यावर बावनकुळे म्हणाले, “ही युती आहे. यात अनेक पक्ष आहेत. अनेक निर्णय घ्यायचे आहेत, त्यामुळे थोडा वेळ लागणारच”.असे मत चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
पुढे बावनकुळे म्हणाले की, “युतीचं सरकार बनवण्यासाठी थोडाफार वेळ लागतो. शिवसेनेला कोणतं मंत्रीपद द्यायचं? राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला (अजित पवार) कोणतं मंत्रीपद द्यायचं? कॅबिनेटचा फॉर्म्युला काय असेल? कोणत्या पक्षाला किती मंत्रीपदं द्यायची? पक्षांचा व महायुतीचा पोर्टफोलिओ कसा असेल? कोणत्या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून कोणत्या नेत्यांची निवड करायची? असे अनेक प्रश्न सोडवावे लागतात. केवळ मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी करून भागत नाही. यासाठीचं सूत्र ठरवावं लागतं आणि मी मघाशी सांगितलेल्या सर्व गोष्टींची पूर्तता करून मग सरकार बनवावं लागतं”.
राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “कुणाकडे किती आमदार आहेत? कोणाला कोणतं खातं हवं आहे? या सगळ्याचा सारासार विचार करून सरकार स्थापन करावं लागतं. मला वाटतं त्यासाठी वेळ जाईल. परंतु लवकरच महाराष्ट्रात नवं सरकार स्थापन होईल. सरकार स्थापनेचा निर्णय घेण्यासाठी तिन्ही पक्षांचं मत घ्यावं लागेल. तिन्ही पक्षांमधील वरिष्ठ नेत्यांची मतं घ्यावी लागतील. त्या सर्व गोष्टींचा विचार करून सरकार बनवावे लागेल. मात्र, मी ठामपणे सांगतो की जेव्हा सरकार बनेल तेव्हा पूर्ण क्षमतेने सरकार उभं असलेलं तुम्हाला दिसेल. सरकार बनवताना सर्व पक्षांना न्याय मिळाला पाहिजे. आमच्या घटक पक्षांना न्याय मिळाला पाहिजे. सगळ्यांचा विचार केला जाईल, त्यानंतर सरकार बनेल,” असे मत चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले आहे.