राज्यात सध्या प्रचाराची रणधुमाळी सुरु झाली आहे. तळकोकणातही निवडणुकीच वातावरण तापलं असताना कुडाळ मालवण मतदार संघात आमदार वैभव नाईक यांनी भाजपाला धक्का दिला आहे. कुडाळ तालुक्यातील ग्रामपंचायत पोखरण-कुसबे बौद्धवाडी येथील कट्टर राणे समर्थक भाजप कार्यकर्त्यांनी भाजप पक्षाला सोडचिठ्ठी देत आज दि. 6 नोव्हेंबर 2024 रोजी आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मशाल हाती घेतली आहे.पोखरण-कुसबे गावचा विकास हा आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून झाला असून विविध योजनांमधून त्यांनी लाखो रुपयांचा विकास निधी देऊन या भागातील ग्रामस्थांची विकासकामे मार्गी लावली आहेत,असे सांगत यापुढील काळातही ते पोखरण-कुसबे गावातील विकासकामांना प्राधान्य देतील,असा विश्वास प्रवेशकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
यावेळी बोलताना प्रवेशकर्ते म्हणाले निलेश राणे यांच्या पडत्या काळात त्यांना भाजप कार्यकर्त्यांनी साथ दिली मात्र विधानसभा निवडणूकीत कुडाळ-मालवण मतदारसंघ हा शिंदे गटाच्या वाट्याला आल्यामुळे त्यांनी भाजप कार्यकर्त्यांचा विचार न करता शिंदे गटामध्ये उडी मारली आहे तसेच राणे कुटुंब हे प्रथम शिवसेना नंतर काँग्रेस,स्वाभिमान पक्ष,भाजप आणि आता निलेश राणे हे शिंदे गटात गेले आहेत,त्यांच्या या सततच्या पक्ष बदलामुळे कार्यकर्त्यांची फरपट होत आहे.त्यांच्या या सततच्या पक्ष बदलाला कंटाळून व निवडणुकीचे वारे बघून पक्ष बदलणाऱ्या निलेश राणे यांच्या नेतृत्वावर विश्वास नसल्याने आपण आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पक्षप्रवेश करत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी बोलताना आमदार वैभव नाईक म्हणाले माझ्यावर व माझ्या पक्षावर जो विश्वास कार्यकर्त्यांनी दाखवला. त्या बद्दल विशेष ऋण व्यक्त करत पोखरण-कुसबे गावचा विकास करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. विकास कामांना निधी कमी पडू दिला जाणार नाही, असा विश्वासही आमदार वैभव नाईक यांनी प्रवेशकर्त्यांना दिला आहे.
यावेळी महेंद्र जाधव, अजय जाधव,अस्मिता जाधव, अश्विनी जाधव, आकाश जाधव, द्रौपदी जाधव, विलास जाधव, विनिता कदम, आनंद जाधव या कट्टर राणे समर्थक भाजप कार्यकर्त्यांनी शिवसेनत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे.याप्रसंगी कुडाळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपतालुकाप्रमुख सचिन कदम,आबा मुंज,आंब्रड विभागप्रमुख विकास राऊळ हे उपस्थित होते.
कुडाळ मालवण मतदारसंघामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे विद्यमान आमदार वैभव नाईक विरुद्ध शिंदे गटाचे निलेश राणे अशी लढत होणार आहे. 2014 मध्ये या मतदारसंघात वैभव नाईक यांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा पराभव केला आणि ते जायंट किलर ठरले होते. 2019 मध्ये वैभव नाईक यांनी सहज विजय प्राप्त केला होता. आता मात्र निलेश राणे यांचे तगडे आव्हान वैभव नाईक यांच्यासमोर आहे. त्यामुळे येथील निवडणूक ही अत्यंत चुरशीची होणार आहे.