सोलापूर दक्षिण विधानसभा यामध्ये धर्मराज काडादी यांच्या उमेदवारीची मागणी (फोटो - टीम नवराष्ट्र)
सोलापूर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या यादी जाहीर करण्यात आली आहे. तिन्ही पक्षांच्या याद्या जाहीर झाल्या आहेत. पण सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघावरुन महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच सुरु आहे. शरद पवार, सुशीलकुमार शिंदे, विजयसिंह मोहिते-पाटील यांनी सिध्देश्वर परिवाराचे प्रमुख धर्मराज काडादी यांना निवडणूक लढविण्याचा आग्रह केला. त्याप्रमाणे मतदारसंघातील जनतेनेही त्यांच्या उमेदवारीचे स्वागत केले. काँग्रेसकडून उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्यांनी काडादी यांच्यासाठी माघार घेण्याची भूमिका घेतली. धर्मराज काडादी हेच महाविकास आघाडीचे सर्वमान्य उमेदवार असल्याने काँग्रेसकडून काडादी यांनाच उमेदवारी मिळावी, अशी एकमुखी मागणी दक्षिण सोलापूर तालुक्यातील नेतेमंडळींनी केली.
शनिवारी, सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील जागावाटप आणि उमेदवारीवरून निर्माण झालेल्या पेचप्रसंगाच्या पार्श्वभूमीवर काडादी यांच्या ‘गंगानिवास’ बंगल्यावर सिध्देश्वर परिवाराच्यावतीने मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात नेत्यांनी अत्यंत आक्रमकपणे आपली भूमिका मांडली. दबाव निर्माण करण्यासाठी नव्हे तर पक्ष नेतृत्वाकडे आपल्या भावना व्यक्त करण्याठी हा मेळावा असल्याचा सूर सामूहिकरित्या नेतेमंडळीमधून व्यक्त झाला. नेतेमंडळींच्या आग्रहामुळे काडादी यांना निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा निर्णय घ्यावा लागला. या निर्णयाचे सर्वस्तरातून स्वागत झाले. आता उमेदवारीवरून घोळ घातला जात आहेत. काडादी यांच्यासारख्या दूरदृष्टी असलेल्या कर्तृत्ववान नेत्याकडे दुर्लक्ष करणे महाविकास आघाडीला आत्मघाताचे ठरेल, असा इशारा अशोक निंबर्गी यांनी दिला.
लोकसभा निवडणुकीत खासदार प्रणिती शिंदे यांना विजयी करण्यासाठी काडादी यांनी अथक प्रयत्न केले. महाविकास आघाडीकडून उमेदवारी न मिळाल्यास परिणाम गंभीर होतील, असा इशारा गुरूसिध्द म्हेत्रे यांनी दिला. “सोलापूर दक्षिणची जागा काँग्रेसला सुटली असल्यास धर्मराज काडादी यांनाच उमेदवारी मिळावी. त्यांच्यासाठी आपण माघार घेतली आहे. आमच्या बंजारा समाजाच्या उन्नतीसाठी काडादी घराण्याचे योगदान महत्त्वाचे असल्याने समाजाचाही त्यांना पाठिंबा असल्याचे” भोजराज पवार यांनी सांगितले.
काँग्रेसच्या उमेदवारीवरून सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाची चर्चा दिल्लीपर्यंत गेली. काँग्रेसच्या बैठकीत ही जागा काँग्रेसला सुटल्याची माहिती आहे. काडादी यांना काँग्रेसची उमेदवारी मिळावी याबाबतच्या सर्वांच्या भावना पक्षनेतृत्वापर्यंत पोहोचविण्यात येईल. शिवसेनेला एबी फॉर्म मिळाला असला तरी उमेदवारी कुणाची ठेवायची आणि कुणाला माघार घ्यायला लावायचे हे सर्वस्वी महाविकास आघाडीचे नेते ठरवतील, असे चेतन नरोटे म्हणाले.
पहिली यादी खरीच होती
ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही पक्षाचे काम करत होतो. पण महाविकास आघाडीकडून अचानक शिवसेनेला जागा सुटली. काय झाले? कोणी केले? माहिती नाही. काँग्र्रेसची प्रसिध्द झालेली पहिली यादी खरीच होती. त्यामध्ये धर्मराज काडादी यांचे नाव होते. नंतर काय झाले हे सांगू शकत नाही. जर शिवसेनेने काडादी यांच्यासाठी काँग्रेेसला जागा सोडली तर त्यांच्या विजयासाठी सगळ्यांनी कामाला लागावे, असे आवाहन सुरेश हसापुरे यांनी केले. दोन दिवस थांबा आणि पाहा, असेही ते म्हणाले.
काडादी यांना हलक्यात घेतल्यास गंभीर परिणाम
बहुसंख्याकांच्या मतांचा विचार करून धर्मराज काडादी यांना उमेदवारी मिळाली पाहिजे. जर या मतांचा विचार झाला नाही तर सोलापूर दक्षिण मतदारसंघातच नव्हे तर सोलापूर शहर उत्तर, सोलापूर शहर मध्य, अक्कलकोट, मोहोळ आणि पंढरपूर-मंगळवेढा या मतदारसंघातही त्याचे परिणाम उमटतील, असा इशारा बाळासाहेब शेळके यांनी दिला. खासदार प्रणिती शिंदे यांच्या लोकसभा निवडणुकीतील विजयात काडादी यांचेही मोठे योगदान आहे. त्यामुळे धर्मराज काडादी यांना हलक्यात घेतले तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असे सूचक विधान शेळके यांनी केले.”आम्हाला कोणावर राग व्यक्त करायचा नाही. ज्येष्ठ नेते शरद पवार, सुशीलकुमार शिंदे आणि खासदार प्रणिती शिंदे यांच्यावर आमचा विश्वास आहे. सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडूनच धर्मराज काडादी यांना उमेदवारी” अशी आग्रही मागणी राजशेखर शिवदारे यांनी केली.
जनमतांचा आदर व्हावा
माजी आमदार गुरुनाथ पाटील यांच्या जयंतीच्या कार्यक्रमात विधानसभेची निवडणूक लढविण्यासाठी धर्मराज काडादी यांच्याकडे आग्रह धरण्यात आला. मात्र, त्यांनी नकार दिला. नंतरच्या काळात नेत्यांनी आणि जनतेनेही उमेदवारीसाठी त्यांना गळ घातली. या अर्थाने काडादी यांची उमेदवारी जनतेतून आली आहे. जनतेच्या मतांचा आणि इच्छेचा आदर करून काँग्रेसने त्यांना उमेदवारी द्यावी, असे आवाहन अॅड. संजय गायकवाड यांनी केले.
काँग्रेसने राजधर्म पाळावा
काँग्रेसच्या उमेदवारीवर धर्मराज काडादी यांचा नैसर्गिक दावा आहे. गटातटासाठी, जातीसाठी नव्हे तर सत्ताधार्यांना धडा शिकविण्यासाठी ते निवडणुकीच्या मैदानात आहेत. ‘अक्कलकोटपासून अकलूजपर्यंत भाजप विरोधात वातावरण निर्माण करण्यात काडादी यांची भूमिका महत्त्वाची आहे. काँग्रेसने काडादी यांना उमेदवारी देऊन राजधर्म पाळावा,’ असे आवाहन कल्याणी कोकरे यांनी केले. ‘काडादी यांची उमेदवारी ठेकेदारीच्या टक्केवारीसाठी नाही. जनतेच्या हितासाठी ते आमदार म्हणून कार्यरत राहतील,’ असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सुभाष पाटील यांनी व्यक्त केला. ‘धर्मराज काडादी हे सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन जाणारे नेते आहेत. आमची घरं सुरक्षित राहण्यासाठी व आमच्या मुलांच्या भविष्यासाठी काडादी यांना काँग्रेसने उमेदवारी द्यावी,’ अशी मागणी शेतकरी संघटनेचे नेते अख्तरताज पाटील यांनी केली.