विनोद तावडे यांच्याबाबत झालेल्या राड्यावर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया (फोटो - सोशल मीडिया)
नागपूर : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी आहे. आज (दि.20) मतदान प्रक्रिया पार पडत असून एकूण 288 जागांसाठी एकाच टप्प्यामध्ये हे मतदान पार पडत आहे. सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. मतदान केंद्राच्या बाहेर कटेकोड बंदोबस्त असून शांततापूर्ण वातावरणामध्ये ही प्रक्रिया पार पडत आहे. महाराष्ट्राच्या अत्यंत महत्त्वाच्या या निवडणुकीमध्ये उमेदवारांचे भवितव्य मतदानपेटीमध्ये आज कुलूपबंद होणार आहे. मात्र मतदानाच्या एक दिवसापूर्वी विरारमधील विवांता हॉटेलमध्ये भाजप नेते विनोद तावडे यांच्या संदर्भात मोठा राडा झाला. यावर आता भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
भाजप नेते विनोद तावडे यांनी विरारमधील हॉटेलमध्ये पैसे वाटत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी विनोद तावडे यांना घेरले. पैसे वाटप करत असल्याचा आरोप करत त्यांनी पाच कोटी आणल्याचे सांगितले. त्याचबरोबर विनोद तावडे यांची डायरी देखील जप्त करण्यात आली. बविआचे नेते आक्रमक झालेले यावेळी दिसून आले. त्यांनी पैशांचे बंडल दाखवून पैसे वाटप करत असल्याचा आरोप केला. यानंतर हॉटेल परिसरामध्ये मोठा राडा झाल्याचे दिसून आले. या प्रकरणावरुन महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजपावर टीकेची झोड उठवली आहे, तर हे आरोप भाजपाकडून फेटाळण्यात आले आहेत. आता या प्रकरणावर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
माध्यमांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “खरं म्हणजे निवडणुकीत जेव्हा पराभव दिसायला लागल्यानंतर जो प्रकार होतो. त्यातलाच हा प्रकार आहे. विनोद तावडे हे आमचे राष्ट्रीय नेते आहेत. त्या ठिकाणी फक्त ते कार्यकर्त्यांना भेटायला गेले होते. त्यांच्याकडे कोणतेही पैसे सापडलेले नाहीत. आक्षेप घेता येतील, अशा कोणत्याही गोष्टी त्यांच्याकडे सापडलेल्या नाहीत. उलट त्यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला आहे. तसेच आमचे नालासोपाऱ्याचे उमेदवार आहेत राजन नाईक यांच्यावरही हल्ला झालेला आहे. त्यामुळे एकूणच महाविकास आघाडीची युको सिस्टम आहे, त्या युको सिस्टमने उद्याचा दिसणारा पराभव पाहता तो कव्हर करण्यासाठी अशा प्रकराचं कव्हर फायरिंग केलं आहे. विनोद तावडे या प्रकरणात कुठेही दोषी नाहीत. त्यांनी कुठलेही पैसे नेलेले नाहीत, कोणतेही पैसे वाटलेले नाहीत आणि कोणलाही पैसे मिळालेले नाहीत”, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर
विनोद तावडेंनी सर्व आरोप फेटाळले
पैसे वाटप आरोप प्रकरणानंतर प्रतिक्रिया देताना विनोद तावडे यांनी म्हटलं की, “पैशासंदर्भातील सर्व बातम्या खोट्या आहेत. त्यामध्ये काहीही तथ्य नाही. हितेंद्र ठाकूर यांनी म्हटलं की भाजपाच्या नेत्यांनी टीप दिली हे देखील खोटं आहे. यात काहीही तथ्य नाही. आम्ही या ठिकाणी बसलो आहोत तर चहाला या. आम्ही त्या ठिकाणी चहा घेण्यासाठी गेलो. एवढं साधं आहे. पण शंका आली आहे ना? तुम्ही पैसे तपासा, सीसीटीव्ही तपासा, काही मिळालं तर कारवाई करा. माझं काहीही म्हणणं नाही”, असं विनोद तावडे यांनी म्हटलं.