File Photo : Diliprao Mane
सोलापूर : धर्मराज काडादी यांना सगळ्यांच्या सहमतीने आणि मोठ्या विश्वासाने आपण निवडणुकीत उभे केले आहे. काडादी हे महाविकास आघाडीचे सर्वमान्य उमेदवार आहेत. काडादी यांच्यासाठी मी माघार घेत त्यांना पाठिंबा दिला आहे. आपल्याला नको असलेला उमेदवार बोकांडी बसू नये म्हणून मीच उमेदवार असल्याचे समजून काडादी यांना विजयी करा, असे आवाहन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार दिलीपराव माने यांनी केले.
सोलापूर दक्षिण मतदारसंघातील प्रमुख अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांनी सोलापूर दक्षिण मतदारसंघात येणार्या उत्तर सोलापूर तालुक्यातील नंदूर, डोणगाव, तेलगाव सीना, पाथरी, बेलाटी, कवठे, तिर्हे, शिवणी, पाकणी आदी गावांचा झंझावाती दौरा करून मतदारांशी संवाद साधला. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार दिलीपराव माने, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके, जिल्हा दूध संघाचे संचालक तथा जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
सोलापूर दक्षिण मतदारसंघात येणार्या उत्तर सोलापूर तालुक्यातील गावांच्या दौर्यात मतदारांशी संवाद साधताना माने यांनी आपली भूमिका सविस्तर मांडली. मधल्या काळात झालेल्या घडामोडींवरही त्यांनी भाष्य केले. सत्ताधार्यांची मुजोरी मोडीत काढणे हे माझे आणि काडादी आम्हा दोघांचे लक्ष्य एकच आहे. जागा कोणत्या पक्षाला सुटली हे आता महत्त्वाचे राहिले नाही. सोलापूर दक्षिणची ही जागा काल काँग्रेसची होती आणि आजही काँग्रेसचीच आहे. पुढेही काँग्रेसचीच राहणार असल्याचा विश्वास माने यांनी व्यक्त केला. त्यामुळे काडादी यांच्या विजयासाठी सर्वांनी कटिबद्ध होणे आवश्यक असल्याचेही माने यांनी सांगितले.
उत्तर सोलापूर तालुक्यातील गावांना नेहमीच दुय्यम वागणूक
काडादी यांच्यासारख्या स्वच्छ प्रतिमेच्या आणि विकासप्रिय नेतृत्वाची गरज असल्याचे सांगत माने म्हणाले, सत्ताधारी आमदारांनी मतदारसंघात विकासकामे न करता आकसबुध्दीने काम केले. केवळ सुडाचे राजकारण करून गावागावात भांडणे लावायचे काम केले आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातील गावांना नेहमीच दुय्यम वागणूक दिली. सोलापूरच्या आसपास असलेल्या या गावांना जोडणारे रस्ते नीट नाहीत. पाच ते आठ किमी अंतरावरील गावांना सोलापूरला येण्यासाठी अर्धा तास लागतो. त्यामुळे गेल्या दहा वर्षांपासून आपल्यावर अन्याय करणारे निवडून आल्यास पुन्हा पाच वर्षे त्यांची मुजोरी सहन करावी लागणार असल्याचे माने यांनी सांगितले.
भाजपचा पराभव करणे हेच आपले लक्ष्य
कै. ब्रह्मदेवदादा माने आणि कर्मयोगी अप्पासाहेब काडादी यांनी खांद्याला खांदा लावून या परिसराच्या विकासासाठी काम केले आहे. ही आठवण सांगून माने म्हणाले, धर्मराज काडादी हे सर्वमान्य आणि सर्वसमावेशक उमेदवार आहेत. गेल्या दहा वर्षांपासून आपल्या मानगुटीवर बसलेल्या भाजपचा पराभव करणे हेच आपले लक्ष्य आहे. यावेळी हाताच्या चिन्हाच्या बदल्यात कॉम्प्युटर आहे. हे प्रत्येक घरापर्यंत सांगावं लागणार असल्याचे आवाहन माने यांनी केले.
सर्वांना सोबत घेऊन काम करणार : काडादी
सहकारमंत्रिपद मिळाल्यानंतर सहकारी संस्थांना बळ देण्याऐवजी त्यांना मोडीत काढण्याचा प्रयत्न केलेल्या भाजपच्या लोकप्रतिनिधीला या निवडणुकीत घरी बसवण्याची गरज आहे. त्यासाठी आपली उमेदवारी असल्याचे स्पष्ट करत सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार व सिध्देश्वर परिवाराचे प्रमुख धर्मराज काडादी म्हणाले, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तथा खासदार शरद पवार, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, खासदार प्रणिती शिंदे यांच्या सूचनेनुसार आणि जनतेच्या व दक्षिणच्या सर्व काँग्रेस नेत्यांच्या आग्रहाखातर आपण उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे.
माजी आमदार दिलीपराव माने यांनी स्वत: माघार घेऊन आपल्या उमेदवारीला पाठिंबा दिला आहे. आज आपल्यासोबत ते प्रचार दौर्यात आले आहेत. आपण सर्वांना सोबत घेऊन, सर्वांच्या सहकार्याने काम करणार आहोत. त्यामुळे मतदारांनी कोणतेही संभ्रम मनात न ठेवता कॉम्प्युटरचे बटण दाबून आपल्याला मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन काडादी यांनी केले.