सौजन्य - नवराष्ट्र टीम
मुंबई : मतदान दिनीचा फार्म १७ सी भाग दोन, फेरीनिहाय तक्ता (परिशिष्ट-५७) व अंतिम निकाल (फार्म-२०) पडताळणीसाठी याची प्रत उमेदवार प्रतिनिधीला त्वरित देण्यात यावी अशा सूचना सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना द्याव्यात, अशी मागणी करणारे पत्र महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पाठविले आहे.
मुख्य निवडणूक अधिकारी यांना पाठवलेल्या पत्रात पुढे असे म्हटले आहे की, निष्पक्ष व पारदर्शक निवडणुकीसाठी लोकप्रतिनिधी कायद्याच्या तरतुदी अन्वये मतमोजणी टेबलवर फेरीनिहाय मतमोजणी झाल्यावर फार्म १७ सी मोजणी प्रतिनिधीची सही घेऊन मोजणी पर्यवेक्षक निवडणूक निर्णय अधिकारी यांना देतो. त्या अगोदर त्याची दुय्यम प्रत मोजणी प्रतिनिधी यास किंवा उमेदवार प्रतिनिधी यास त्वरित देण्यात यावी. तसेच फेरीनिहाय तक्ता हा फार्म १७ सी भाग २ वरून सहायक निवडणूक अधिकारी तयार करतो तो परिशिष्ट ५७ च्या तक्त्याची दुय्यम प्रत उमेदवार प्रतिनिधीला त्वरित देण्यात यावी. ही कायदेशीर तरतूद असून याद्वारे मतमोजणी प्रक्रिया पारदर्शक आहे हे समजून येईल.
हे सुद्धा वाचा : मतमोजणीनिमित्त पुणे शहरात कडेकोट बंदोबस्त; तब्बल हजारो पोलीस असणार तैनात
मताचे संकलन फॉर्म २० मध्ये काटेकोरपणे झाले आहे की नाही हे उमेदवार प्रतिनिधीला प्राप्त फार्म १७ सी भाग २ तसेच फेरीनिहाय तक्त्यावरून होवू शकते. या कायदेसंमत बाबी ध्यानात घेवून संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांना आपल्या स्तरावर या प्रक्रियेची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सुचना द्याव्यात, असे या पत्रात म्हटलेले आहे.
निकालावर 50 कोटींचा सट्टा
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ साठी मतदान पूर्ण झाले असून या निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील महायुती आघाडी आणि महाविकास आघाडी (एमव्हीए) यांच्यात चुरशीच्या लढतीचे चित्र आहे. त्याचवेळी बहुतेक एक्झिट पोल्समध्ये महायुतीला आघाडी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, निवडणुकीच्या निकालाचा परिणाम केवळ राज्याच्या राजकारणावरच नाही तर, शेअर बाजार आणि देशाच्या आर्थिक धोरणांवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. निकालापूर्वी विविध ठिकाणी पैजा लागल्या आहेत. सट्टेबाजारही तेजीत आहे. छत्रपती संभाजी नगर शहरात निवडणूक निकालावर 50 कोटींचा सट्टा लागला आहे.
छत्रपती संभाजी नगर पश्चिम, पूर्व आणि मध्य विधानसभेवर सट्टा लागला आहे. कोण निवडून येणार यासाठी सट्टा बाजार तेजीत आहे. संभाजीनगरच्या निकालाबाबत सट्टा बाजारातील बुकी देखील संभ्रमात आहे. कोण निवडून येईल याबाबत सट्टा बाजारातही संभ्रम आहे. सर्वाधिक संभ्रम पश्चिम विधानसभा मतदारसंघात आहे. या मतदार संघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राजू शिंदे निघणार की शिवसेना शिंदे गटाचे संजय शिरसाठट निवडून येणार? याबाबत सट्टा बाजारातही संभ्रम आहे.