रावसाहेब दानवे यांच्या मुलीचा शिंदे गटात प्रवेश होणार आहे. (फोटो - सोशल मीडिया)
मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण तापले आहे. राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महायुतीसह महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर करण्यात येत आहेत. पहिल्यांदाच तीन पक्षांची युती निवडणुकीला सामोरे जात असल्यामुळे जागावाटपामध्ये मोठा पेच निर्माण होत आहे. त्यामळे काही नेते नाराज आहेत. तर काही नेत्यांची पक्षांतर वाढली आहेत. भाजपचे महत्त्वपूर्ण नेते एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत.
भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (यांच्या कन्या संजना जाधव या पक्षप्रवेश करणार आहेत. संजना जाधव या आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. संजना जाधव या कन्नड विधानसभेतून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असून त्यांना शिवसेना शिंदे गटातून उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. कन्नड-सोयगाव विधानसभा मतदारसंघ हा महायुतीमध्ये शिंदे गटाकडे आला आहे. त्या इच्छुक असल्यामुळे आता शिंदे गटामध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांची उमेदवारी जवळपास निश्चित धरली जात आहे. त्यामुळे रावसाहेब दानवे यांचे पुत्र संतोष दानवे हे भाजपकडून भोकरदन मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. तर रावसाहेब दानवे यांच्या मुलगी संजना जाधव या शिंदे गटाकडून निवडणूक लढवणार आहेत.
हे देखील वाचा : देवेंद्र फडणवीस यांच्याशी आमची दुश्मनी नाही…; संजय राऊत नेमकं म्हणाले तरी काय?
कन्नड-सोयगाव विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे विद्यमान आमदार उदयसिंह राजपूत यांना पक्षाने दुसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे. बंडाखोरीचे राजकारण झाल्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरेंना साथ देण्याचा निर्णय घेतला होता. आता त्यांना त्यांच्या निष्ठेचे फळ मिळाले असून पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे. तर महायुतीमध्ये हा मतदारसंघ शिंदे गटाकडे आला आहे. त्यामुळे या मतदारसंघातून इच्छुक असलेला रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव या शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.
हे देखील वाचा : अजित पवार गटाकडून तिसरी उमेदवार यादी जाहीर; ‘या’ बड्या नेत्यांना मिळाली संधी
कोण आहेत संजना जाधव?
भाजप नेते रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव आहेत. माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या त्या विभक्त पत्नी आहेत. त्यांना कन्नड तालुक्यात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. भाजपकडून लढण्यासाठी संजना जाधव या प्रयत्न करत होत्या. मात्र महायुतीच्या जागावाटपात ही जागा शिंदे गटाच्या वाट्याला आली आहे. त्यामुळे संजना जाधव या शिंदे गटात प्रवेश करून निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत.