संजय राऊतांचा भाजप व देवेंद्र फडणवीसांवर निशाणा (फोटो - सोशल मीडिया)
मुंबई : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. सर्व राजकीय पक्षांची जोरदार तयारी सुरु असून उमेदवारांची यादी जाहीर केली जात आहे. महायुतीसह महाविकास आघाडीने उमेदवारांची नावे जाहीर केली असून त्यांनी अर्ज देखील दाखल केले आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊतांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी वांद्रे टर्मिनसवर चेंगराचेंगरी प्रकरणावरुन केंद्र सरकारला धारेवर धरले. तसेच राज्यातील भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील मत व्यक्त केले आहे.
वांद्रे रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची चेंगराचेंगरी झाल्यामुळे खासदार संजय राऊतांनी रोष व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, “मोदींचे सरकार आल्यापासून जवळ जवळ देशात रेल्वेचे 28 मोठे अपघात झाले आहेत. तुम्ही बुलेट ट्रेनवर चर्चा करत आहात ती हाय स्पीड ट्रेनवर चर्चा करत आहात. पण मुंबई उपनगरीय रेल्वेच्या बाबतीत ज्या सुधारणा करायला पाहिजे. त्या संदर्भात कोणीही चर्चा करायला तयार नाही. रेल्वेच्या समस्या वर्षांनी वर्षा तसेच आहेत. आज रविवारच्या दिवशी देखील एवढी प्रचंड गर्दी होऊन एवढी चेंगराचेंगरी झाली काही लोक जखमी झाले. रेल्वेमंत्री महाशय आहेत ते बुलेट ट्रेनच्या मस्तीमध्ये आहेत. त्यांचे पाय जमिनीवर नाही आहेत. आणि आमचे लोक जे प्रवासी आहेत ते चेंगरून मरत आहेत. किती लोक मरण पावले काय केलं रेल्वे मंत्र्यांनी?” असा सवाल संजय राऊतांनी व्यक्त केला आहे.
देवेंद्र फडणवीस व उद्धव ठाकरे या नेत्यांमध्ये जोरदार राजकीय वादंग निर्माण झाला आहे. यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले की, “व्यक्तिगत दुश्मनी राजकारणात असू नये. पण भारतीय जनता पक्षाने व्यक्तिगत दुश्मनी तयार केली आहे. राजकारणात विचारांची लढाई विचाराने व्हावी. व्यक्तिगत दुश्मनी घेऊन राजकारण करू नये. हे महाराष्ट्रामध्ये एक संस्कार आहेत. भारतीय जनता पक्षाच्या हातात विशेषतः फडणवीस यांच्या हातात आणि दिल्लीमध्ये मोदी – शहा यांच्या हातात सूत्र गेल्याने राजकारण हे कुटुंबापर्यंत दुश्मनी निर्माण करण्यापर्यंत गेला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याशी आमची वैयक्तिक दुश्मनी नाही. ते केवळ आमचे राजकीय शत्रू आहेत. पण मी फडणवीसांसोबत कधीही चहासुद्धा प्यायला नाही. मी एक कडवट शिवसैनिक आहे,” असे मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.
हे देखील वाचा : भाजपने तिकीट नाकारल्याने आमदार ढसाढसा रडले; ईमानदारीने काम केलं पण…
खासदार संजय राऊत यांनी रामदास आठवले यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, “दलितांना कधीच काही मिळत नाही फक्त जे काही आहे आठवलेंना मिळतं. दलित समाजाचे नेतृत्व करणारे ते नेते आहेत ते फक्त स्वतःपुरतं पाहतात. आठवल्यांना काही मिळालेलं नाही असं म्हणता येणार नाही. अनेक वर्ष ते मंत्री आहेत महाराष्ट्रात केंद्रामध्ये समाज मात्र मेंढरासारखा मागे जातात. लोकसभेत आम्ही पाहिले संविधानाच्या नावाखाली महाविकास आघाडी बरोबर हा संपूर्ण समाज राहिला आणि यापुढेही राहील,” असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले.