उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी सदा सरवणकर यांनी घातली अट (फोटो - सोशल मीडिया)
माहिम : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरु आहे. अवघ्या काही दिवसांवर निवडणूक आली असून 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. 23 नोव्हेंबर या दिवशी निकाल हाती येणार असून यामुळे राजकारण रंगले आहे.मात्र एक मतदारसंघामुळे चर्चांना उधाण आले आहे. राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे माहिम मतदारसंघामधून निवडणूक लढणार आहेत. पण त्यांना पाठिंबा देण्यावरुन महायुतीमध्येच दोन गट पडल्याचे दिसून येत आहे. आता यावरुन शिंदे गटाचे माहिम मतदारसंघाचे उमेदवार सदा सरवणकर यांनी स्पष्टच भूमिका मांडली आहे.
राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढवत आहेत. त्यांना मनसेकडून माहिम मतदारसंघामधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. महायुतीकडून हा मतदारसंघ शिंदे गटाकडे आला आहे. शिंदे गटाने सदा सरवणकर यांना उमेदवारी दिली असून त्यांनी उमेदवारी अर्ज देखील दाखल केला आहे. मात्र भाजपकडून अमित ठाकरे यांना महायुतीने पूर्ण पाठिंबा देण्याची मागणी केली जात आहे. राज ठाकरे यांनी भाजपला लोकसभा निवडणुकीमध्ये बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यामुळे त्यांच्या पुत्राला विधानसभा निवडणुकीमध्ये बिनविरोध पाठिंबा द्यावा अशी मागणी भाजप नेत्यांकडून केली जात आहे. मात्र सदा सरवणकर हे निवडणूक लढण्यावर ठाम आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा झाल्यानंतर देखील ते आपल्या निर्णयावर ठाम आहेत. यावरुन जोरदार राजकारण रंगलेले असताना मी फॉर्म मागे घेतो पण एक अट आहे, असे म्हणत सदा सरवणकर यांनी अट घातली आहे.
माहिम मतदारसंघातून अर्ज मागे घेणार का असा सवाल सदा सरवणकर यांना विचारला गेला. यावेळी एका वृत्त वाहिनीसोबच चर्चा करताना सदा सरवणकर म्हणाले, “एकनाथ शिंदे यांनी पुन्हा मुख्यमंत्री व्हावं, अशी सर्वसामान्य जनतेची इच्छा आहे. मनसेने महायुतीविरोधात सगळ्याच ठिकाणी आपले उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे महायुतीविरोधात उभे केलेले मनसेने उमेदवार मागे घ्यावे. त्यानंतर मी पक्षासाठी उमेदवारी मागे घेण्यास तयार आहे, मी पक्षासाठी त्याग करण्यास तयार आहे,” असे मत सदा सरवणकर यांनी व्यक्त केले आहे.
हे देखील वाचा : फोडाफोडी, गुवाहाटी, सुरत लोकं विसरली नाहीत…; मविआच्या नेत्यांचा जोरदार घणाघात
काकांकडून सुद्धा उमेदवार रिंगणात
यंदाची विधानसभा निवडणूक ही अत्यंत महत्त्वाची आहे. राज्यामध्ये बंडखोरीचे राजकारण झाल्यानंतर ही पहिलीच विधानसभा निवडणूक असल्यामुळे सर्वच पक्षांसाठी ही प्रतिष्ठेची ठरत आहे. त्यामुळे जास्तीत जागांवर दावा करुन उमेदवार जाहीर केले जात आहे. माहिम मतदारसंघामध्ये अमित ठाकरे यांच्यासमोर दोन बड्या नेत्यांचे आव्हान असणार आहे. अमित ठाकरे यांच्या विरोधात उद्धव ठाकरे यांनी देखील उमेदवार जाहीर केला आहे. ठाकरे गटाकडून महेश सावंत यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आदित्य ठाकरे यांच्या पहिल्या विधानसभा निवडणुकीवेळी राज ठाकरे यांनी वरळीमधून उमेदवार दिला नव्हता. मात्र उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंची पहिली निवडणूक असताना देखील उमेदवार जाहीर केला आहे.