कोल्हापूरमधील नेत्यांनी साधला एकनाथ शिंदेंवर निशाणा (फोटो - सोशल मीडिया)
कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार प्रचार सुरु आहे. सभा व बैठका सुरु आहेत. तर नेत्यांची तुफान टोलेबाजी सुरु आहे. येत्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून 23 नोव्हेंबरला मतमोजणी करुन निकाल जाहीर केला जाणार आहे. पहिल्यांदाच तीन पक्ष मिळून एकत्रित निवडणुक लढवत आहेत. महाविकास आघाडी व महायुती पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीला सामोरे जात आहे. तर बंडखोरीच्या राजकारणानंतर देखील ही पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळे नेत्यांसाठी ही प्रतिष्ठेची लढाई ठरत आहे. आता कोल्हापूर काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी महायुतीवर आणि शिंदे गटावर निशाणा साधला आहे.
आमदार सजेत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध राजकीय विषयांवर भाष्य केले. तसेच आगामी निवडणुकांसाठी महाविकास आघाडीची तयारी देखील सांगितली. सतेज पाटील म्हणाले की, कोल्हापूरची जनता पुन्हा एकदा मान गादीला देईल, छत्रपती घराण्याबद्दल कोल्हापूरकरांना प्रचंड आधार आहे. काँग्रेसचे उमेदवार म्हणून मधुरिमाराजे निवडणुकीमध्ये विजयी होतील. कोल्हापूरची जनता विश्वास आणि सत्याच्या बाजूने उभा राहील, असा विश्वास सतेज पाटील यांनी व्यक्त केला. त्याचबरोबर उद्धव ठाकरे हे पाच नोव्हेंबर रोजी कोल्हापूरात दौरा करणार आहेत, अशी माहिती सतेज पाटील यांनी दिली आहे.
सतेज पाटील यांनी महायुती व शिंदे गटावर निशाणा साधला आहे. सतेज पाटील यांनी पुन्हा एकदा राजकीय वर्तुळामध्ये एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीची आठवण करुन दिली आहे. सतेज पाटील म्हणाले की, फोडाफोडी गुवाहाटी, सुरत ही लोक अजूनही विसरले नाहीत. कोल्हापूरला भाजपने टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांना यश कधीच आलं नाही, असा घणाघात सतेज पाटील यांनी केला आहे.
एकनाथ शिंदे व उद्धव ठाकरे यांचा प्रचार हा एकाच दिवशी सुरु होणार आहे. कोल्हापूरमध्ये दोन्ही नेते प्रचाराचा शुभारंभ करणार आहेत. उद्धव ठाकरे 5 नोव्हेंबर रोजी करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेऊन प्रचाराला सुरुवात करणार आहेत. उद्धव ठाकरे यांचे अॅजिओप्लास्टी करण्यात आली होती. त्यानंतर आता त्यांची प्रकृती सावरली असून त्यांनी पक्षप्रवेश व जागावाटप यामध्ये सहभाग घेतला. त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांनी आपला मोर्चा प्रचाराकडे वळवला आहे. आता उद्धव ठाकरे कोल्हापूरमध्ये प्रचाराचा नारळ फोडणार आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेना ठाकरेंच्या वाट्याला अवघ्या दोन जागा आल्या असून दोन माजी आमदारांनी सुद्धा स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश केला आहे.