"मी निडणूकीच्या रिंगणात उतरणार...", कल्याण पुर्वमध्ये शिंदेंचा शिलेदार अपक्ष लढणार
महायुतीत जागा वाटपानंतर इच्छुकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. कल्याणचे भाजपचे माजी आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना भाजपने उमेदवारी दिल्यानंतर शिंदे गटातील माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी उघडपणे बंडाचा इशारा दिला होता. सुलभा गायकवाड या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत, तर दुसरीकडे शिवसेनेचे शिंदे गटाचे पदाधिकारी व माजी नगरसेवक विशाल पावशे हेही २५ तारखेला उमेदवारी दाखल करणार आहेत. असे असताना शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड, विधानसभा प्रमुख नीलेश शिंदे हे दोन्ही इच्छुकही विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे.
कल्याण पूर्व हा मतदार संघ राजकीय दृष्ट्या अंत्यत संवेदनशील मतदार संघ आहे.कल्याण पूर्वेचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी एका जमीनीच्या वादातून कल्याण पूर्वेतील शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता.या प्रकरणात आमदार गायकवाड हे तळोजा कारागृहात आहे.
तर विधानसभा निवडणूकीत कल्याण पूर्वेतून भाजप आमदार गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना भाजपने अधिकृत उमेदवारी दिली आहे. त्यांची उमेदवारी घोषित होता, कल्याण पूर्वेतील शिंदे सेनेतील इच्छूक महेश गायकवाड आणि निलेश शिंदे यांनी आमची महायुती असली तरी आमदार गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांचे काम करणार नाही असा निर्धार केला आहे. प्रसंगी वेगळा पर्याय निवडू, पण काम करणार नाही यावर ही मंडळी ठाम आहेत.
मात्र शिवसेनेकडून इच्छूक असलेले शिवसेनेचे विशाल पावशे यांनी आधीपासून त्यांची भूमिका स्पष्ट केली होती. कल्याण पूर्वेच्या विकासासाठी निवडणूक लढविणार असे जाहिर केले होते. बॅनर लावून नागरीकांना ते आवाहन करीत होते. आत्ता त्यांनी कोणत्याही परिस्थितीत निवडणूक रिंगणात उतरणार असे ठाम सांगितले. येत्या दोन दिवसात उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.