विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगोल विधानसभा मतदारसंघाचे समीकरण (फोटो - टीम नवराष्ट्र)
सोलापूर : शेखर गोतसुर्वे : शेकापच्या बालेकिल्ल्यात शिवसेना उबाठा आणि शिवसेना शिंदे गटात कडवी झुंज लागली आहे. सांगोल्यात तिरंगी लढत होत असून शहाजीबापू पाटील, दिपक साळुंखे पाटील व डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी सभेसह झंझावती दौरा पार पाडत आहेत.
गेल्या वीस वर्षांपासून शेकापचे सांगोला विधानसभा मतदारसंघात निर्विवाद वर्चस्व होते. स्वर्गीय गणपतआबा देशमुख यांनी बालेकिल्ला मजबूत ठेवला होता. २०१९ विधानसभा निवडणूकीत सत्ता उलथवून लावण्यात शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार शहाजीबापू पाटील यांना अखेर यश मिळाले होते .
या अटीतटीच्या लढतीत गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ. अनिकेत देशमुख यांचा केवळ 768 मतांनी पराभव करत निसटता विजय मिळविला होता . शहाजीबापू पाटील यांना 99 हजार 464 तर अनिकेत देशमुख यांना 98 हजार 696 मते मिळाली होती . यंदाच्या निवडणूकीच्या रणधुमाळीत उबाठा गटाने शिवसेना शिंदे गटासमोर मोठे आव्हान उभे केले आहे . उबाठा गटाचे माजी आमदार दिपक साळुंखेपाटील यांना उमेदवारी देत दंड थोपटले आहे. तर काय झाडी, काय डोंगर फेम शिंदे गटातील उमेदवार शहाजी बापू पाटील हे मैदान गाजवत आहेत. अनिकेत देशमुख शेकापकडून यंदा निवडणूक रिंगणात उभे नाहीत. त्यांच्या जागी बंधू बाबासाहेब देशमुख उभे आहेत.
गणपतराव देशमुख यांचा पराभव करून विधानसभेत
सांगोला विधानसभा मतदारसंघ आणि गणपतराव देशमुख हे समीकरण संपूर्ण राज्याने पहिले आहे. 1962 पासून गणपतराव देशमुख सलग या मतदारसंघातून निवडून येत होते. पण शहाजी पाटील यांनी 1995 साली गणपतराव देशमुख यांचा पराभव करत विधानसभेत प्रवेश केला. फक्त 192 मतांनी ते निवडून आले होते. 1995 सालचा एक विजय सोडला तर शहाजी पाटील यांना सलग पराभवाला सामोरं जावं लागलं. 1995 नंतर 1999, 2004, 2009 असे सलग चार पराभव त्यांनी स्वीकारले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती संभाजीनगरमधील सभा
अखेर विजय मिळवला
अखेर 2014 च्या विधानसभेपूर्वी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. पण तरीही त्यांना या निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला. राज्यात शिवसेना-भाजप युतीची सत्ता आल्यांनतर शहाजी पाटील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळीकीमुळे भाजपात प्रवेश करणार अशा चर्चा असताना युतीच्या वाटपात जागावाटपामध्ये ही जागा शिवसेनेला सुटल्यामुळे 2019 विधानसभा ते शिवसेनेच्या चिन्हावर लढले. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी गणपतराव देशमुख यांनी माघार घेतल्यामुळे गणपतराव देशमुख यांचे नातू अनिकेत देशमुख यांच्याशी त्यांची लढत झाली त्यात ते विजयी झाले.
नाशिकच्या प्रचारसभेमध्ये सुप्रिया सुळेंची देवेंद्र फडणवीसांवर टीका
आघाडीत बिघाडी
सांगोला विधानसभा मतदारसंघात आघाडीत बिघाडी झाली आहे. कारण महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शेकापने सांगोल्याच्या जागेवर दावा केला होता. बाबासाहेब देशमुख हे या विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यावर ठाम होते. मात्र महाविकास आघाडीकडून दीपक साळुंखे पाटील यांना उबाठा गटाने उमेदवारी दिल्याने आघाडीत बिघाडी झाली आहे.
आजी माजी मुख्यमंत्री आमने सामने
सांगोला मतदार संघात प्रतिष्ठेची आणि चुरशीची लढत मानली जात आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रणांगणांत आमने आले आहेत. जोरदार सभा आणि भाषणाने येथील वातावरण ढवळून निघाले आहे . संपूर्ण राज्यात या लढतीने लक्ष वेधले आहे .