File Photo : BJP Flag
पुणे : भारतीय जनता पक्ष हा विचारांवर चालणारा पक्ष असल्याचा दावा केला जातो. भाजपच्या त्यांच्या काही विचारधारा असून काही परंपरेला त्यांचा तीव्र विरोध आहे. आता विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची जोरदार तयारी सुरु आहे. उमेदवारी जाहीर करण्यामध्ये बाजी मारत भाजपने पहिली यादी जाहीर केली आहे. 99 उमेदवार जाहीर करत भाजपने उमेदवार घोषित केले आहेत. यामध्ये बहुतांशी उमेदवार विद्यमान असले तरी काही उमेदवारांचे चेहरे हे नवीन आहेत. राजकीय वर्तुळामध्ये हे नवीन चेहरे असले तरी त्यांचे राजकारणाशी कौटुंबिक संबंध आहेत. आधी घराणेशाहीला विरोध करणाऱ्या भाजपमध्ये आता सर्रास राजकीय घराणेशाही परंपरा सुरु झाली आहे.
भाजपला केंद्रामध्ये सत्तेवर येऊन तब्बल तीन टर्म झाली आहेत. मागील अनेक वर्ष भाजप राज्यामध्ये देखील सत्तेवर आहेत. उद्धव ठाकरेंच्या मंत्रिपदाचा कार्यकाळ सोडला तर भाजप 2014 नंतर सत्तेवर आहेच. केंद्रासह आता राज्यामध्ये भाजपमध्ये राजकीय नेत्यांच्या नातेवाईकांना किंवा जवळच्या व्यक्तींना उमेदवारी देण्यास सुरुवात झाली आहे. आधी कॉंग्रेस सरकारच्या काळामध्ये भाजपकडून घराणेशाहीच्या मुद्द्यावर जोरदार टीकास्त्र डागण्यात आले. कॉंग्रेसमधील घराणेशाही भाजपकडून हल्लाबोल करत भाजपामध्ये कार्यकर्त्यांना सुद्धा संधी दिली जाते असा दावा करण्यात येत होता. राजकारणातील घराणेशाही संपवण्यासाठी भाजप आहे, असे देखील भाजपकडून सांगण्यात येत होते. आता मात्र महाराष्ट्रामध्ये भाजपने घराणेशाहीची परंपरा सुरु केल्याचे दिसून येत आहे. भाजपच्या पहिल्याच यादीमध्ये अशा कौटुंबिक चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.
हे देखील वाचा : पुण्यातील विधानसभेचे भाजप उमेदवार जाहीर; कसबा विधानसभा मतदारसंघ मात्र प्रतिक्षेत
श्रीजया अशोक चव्हाण
भाजपकडून पहिल्या यादीमध्ये भोकर विधानसभा मतदारसंघातून श्रीजया चव्हाण यांना संधी देण्यात आली आहे. काही महिन्यांपूर्वी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. प्रवेशानंतर लगेचच त्यांना राज्यसभेची खासदारी देण्यात आली. राज्यामध्ये राजकारण करणाऱ्या अशोक चव्हाण यांची वर्णी दिल्लीमध्ये लागल्यामुळे त्यांचा मतदारसंघ रिकामा होता. आता अशोक चव्हाण यांच्या मुलीला श्रीजया अशोक चव्हाण यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे.
शंकर जगताप
भाजपकडून पिंपरी चिंचवड मतदारसंघासाठी देखील यंदा नवीन उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. चिंचवड विधानसभा दिवंगत नेते लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली. यावेळी त्यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना संधी देण्यात आली. आता मात्र पुन्हा विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर दिवंगत नेते लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये उमेदवारीची परंपरा जगताप कुटुंबाकडे राहिली आहे.
विनोद शेलार
त्याचबरोबर भाजपकडून मुंबई शहराध्यक्ष आशिष शेलार यांना वांद्रे पश्चिम या मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली आहे. त्याचबरोबर आशिष शेलार यांचे बंधू विनोद शेलार यांची देखील राजकारणामध्ये एन्ट्री झाली आहे. विनोद शेलार यांना भाजपकडून मलाड पश्चिम या मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे राजकीय कुटुंबातच उमेदवारीची समीकरणे फिरत असल्याचे स्पष्ट दिसून आले आहे.
राहुल प्रकाश आवाडे
त्याचबरोबर इचलकरंजीमध्ये भाजपने आवाडे सोबत अशाच प्रकारे राजकीय गणित साधण्याचा प्रयत्न केला आहे. इचलकरंजीमध्ये विद्यमान प्रकाश आवाडे हे अपक्ष आणि भाजप सहयोगी आमदार आहेत. आता आवाडे यांच्या मुलाला भाजपने इलचकरंजीमध्ये उमेदवारी जाहीर केली आहे. राहुल प्रकाश आवाडे यांना इचलकरंजीमधून भाजपने पहिल्या यादीमध्ये उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे आधी भाजपमध्ये तीव्र विरोध असलेल्या घराणेशाही पायमुळं भाजपमध्ये फुटली आहेत, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.