ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करत प्रकाश आंबेडकर यांचे आंदोलन (फोटो - सोशल मी़डिया)
मुंबई : विधानसभा निवडणुकीनंतर राज्यामध्ये जोरदार राजकारण रंगले आहे. यंदाची लढाई ही अटी तटीची होईल अशी अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात निकाल हा पूर्णपणे महायुतीच्या बाजूने एकतर्फी लागला आहे. बहुमतापेक्षा अधिक मताधिक्य मिळवून देखील अद्याप सत्ता स्थापनेचा दावा करण्यात आलेला नाही. महाविकास आघाडीला आणि इतर राज्यातील प्रादेशिक पक्षांना निकालाचा मोठा धक्का बसला. यामध्ये ईव्हीएममध्ये घोळ झाला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. अचानक रात्री मताधिक्य वाढल्याच्या आरोपावर कॉंग्रेसची निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक देखील झाली. यावर आता प्रकाश आंबेडकर यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
विधानसभा निवडणुकीमध्ये कॉंग्रेसला मोठा धक्का बसला आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे देखील अगदी काठावर पास झाले आहेत. यानंतर कॉंग्रेस नेत्यांनी निवडणूक आयोगावर अचानक मतदान वाढल्याचे आणि ईव्हीएम मशीनवर संशय व्यक्त केला होता. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या निर्णयावर ईव्हीएम घोटाळ्यावरुन संशयाची सुई फिरत आहे. ईव्हीएम मशीन विरोधात अनेक नेत्यांनी व पक्षांनी विपरित भूमिका घेतली आहे. यानंतर आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी जनआंदोलन पुकारले आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
निवडणुकीमध्ये सत्ताधारी भाजपक़डून ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार करुन घोटाळा करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याविरोधात आता वंचित बहुजन आघाडी मैदानात उतरली आहे. वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी जनआंदोलन उभा करणार असल्याचे सांगितले आहे. राज्यभरात स्वाक्षरी मोहीम राबवून आंदोलनाची सुरुवात केली जाणार असल्याची माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे.
राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर
वंचित बहुजन आघाडीच्या EVM विरोधात स्वाक्षरी मोहीमेला सुरुवात.
आज अकोला येथे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांसह स्वाक्षरी करून या मोहिमेला सुरुवात झाली. pic.twitter.com/B8yaQWR9hi
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) December 3, 2024
जनआंदोलनाची माहिती देताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, “वंचित बहुजन आघाडीच्यावतीने राज्यभरात EVM विरोधी जनआंदोलनाची हाक देण्यात आली आहे. 3 डिसेंबर ते 16 डिसेंबरपर्यंत ही स्वाक्षरी मोहिम सुरू असेल. स्वाक्षरी मोहिमेपासून सुरुवात करून टप्या टप्प्याने हे आंदोलन तीव्र करण्यात येणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी पुणे येथे झालेल्या राज्य कार्यकारिणी बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून, 3 डिसेंबर ते 16 डिसेंबरपर्यंत राज्यात EVM विरोधी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येणार आहे. EVM च्या विरोधात आरपारची लढाई लढण्याचा निर्णय वंचित बहुजन आघाडीने घेतला आहे. वंचित बहुजन आघाडीचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते हे आपापल्या विभागात ही मोहीम राबविणार आहेत. सर्व मतदारांनी या मोहिमेत सहभागी होऊन EVM ला हद्दपार करण्यासाठी हातभार लावावा असे आवाहन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात येत आहे,” अशी माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे.