फोटो सौजन्य - Social Media
‘धुरंधर 2’मधील ‘जाइये सजना’ या गाण्यामुळे पुन्हा चर्चेत आलेले आधुनिक सूफी गायक सतींदर सरताज यांनी आपल्या चाहत्यांसमोर आयुष्यातील एका खास नात्याचा भावनिक प्रवास उलगडला आहे. त्यांच्या लोकप्रिय ‘येझदी’ या गाण्याच्या सुरावटीवर आधारित नव्या व्हिडिओमध्ये त्यांनी अनेक वर्षांपासून सोबत असलेल्या येझदी मोटारसायकलशी असलेले जिव्हाळ्याचे नाते दाखवले आहे.
सरताज यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये नुकतीच मिळालेल्या कस्टमाइज्ड येझदी रोडस्टरबद्दल आनंद व्यक्त करत अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला. या व्हिडिओमध्ये ते चंदीगडमधील अशा ठिकाणी फिरताना दिसतात, जिथे गायक, कवी, संगीतकार आणि अभिनेता म्हणून त्यांचा प्रवास आकाराला आला. त्यांच्या मते, येझदी ही केवळ एक मोटारसायकल नसून आयुष्यातील अनेक महत्त्वाच्या क्षणांची साथीदार आहे.
आपल्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की, पुनर्संचयित केलेल्या जुन्या येझदीचा आवाज ऐकून अनेक जण भावूक झाले आणि इतिहास व वारशाबद्दल लोकांमध्ये असलेला आदर पाहून त्यांनाही समाधान वाटले. तसेच नवीन कस्टमाइज्ड रोडस्टरसाठी त्यांनी संबंधित टीमचे आभार मानत पुढील प्रवासासाठी उत्सुक असल्याचे सांगितले.
विशेष म्हणजे, 2023 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘येझदी’ या गाण्यातही सरताज यांनी या प्रतिष्ठित मोटारसायकलला आदरांजली वाहिली होती. त्यांच्या पेस्टल-हिरव्या D250 क्लासिकवर चित्रित झालेल्या या गाण्यात प्रेम, आठवणी आणि पंजाबच्या मोटारसायकल संस्कृतीचा सुंदर संगम पाहायला मिळाला होता. त्यामुळे हे गाणे संगीतप्रेमींसह बाइकप्रेमींमध्येही तितकेच लोकप्रिय ठरले.
आता त्यांच्याकडे असलेली शार्कस्किन ब्लू रंगातील कस्टम येझदी रोडस्टर खास “Satinder Sartaaj × Yezdi” ग्राफिक्सने सजवण्यात आली आहे. तिची रचना सरताज यांच्या कलात्मक व्यक्तिमत्त्वाचे प्रतिबिंब मानली जात आहे. त्यांच्या मते, जसे ते सूफी आणि पंजाबी परंपरा आधुनिक श्रोत्यांपर्यंत पोहोचवतात, तसेच येझदीसोबतचे त्यांचे नातेही अस्सलपणा, स्वातंत्र्य आणि भावनिक जिव्हाळ्यावर आधारित आहे.
या नव्या व्हिडिओनंतर चाहत्यांना हे स्पष्ट झाले आहे की, ‘येझदी’ गाण्यात दिसलेली मोटारसायकल ही केवळ चित्रिकरणासाठी वापरलेली वस्तू नव्हती, तर ती सरताज यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. आता नवीन रोडस्टरच्या रूपाने त्यांच्या या अनोख्या प्रवासाला आणखी एक नवा अध्याय लाभला आहे.






