ऑपरेशन टायगरच्या चर्चांदरम्यान प्रताप सरनाईकांचे मोठे वक्तव्य
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील काही खासदार फुटणार असल्याच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडून ‘ऑपरेशन टायगर’ राबवले जात असल्याचा दावा केला जात असून, याच ‘ऑपरेशन टायगर‘ च्या अंतर्गत ठाकरे गटातील काही खासदार वेगळा गट स्थापन करण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चाना उधाण आले आहे. याच पार्श्वभूमीवर आता शिवसेना नेते आणि परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी मोठे वक्तव्य केले आहे.
प्रताप सरनाईक यांनी पक्षप्रवेशावर भाष्य करत म्हंटले कि, “एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन कार्यकर्ते, शिवसैनिक, नगरसेवक, महापौर, आमदार, खासदार यांना पक्षात प्रवेश करायचा असेल तर त्यांच्यासाठी 24 तास 365 दिवस दरवाजे खुले आहेत. आजही एकनाथ शिंदे रात्री दोन वाजेपर्यंत काम करतात. त्यांची काम करण्याची पद्धत जर आवडत असेल आणि त्यांना पक्षात प्रवेश करायचा असेल तर आम्ही त्यांच्या स्वागताला तयार आहोत,” असे ते म्हणाले.
शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संपर्कात असल्याच्या चर्चांवर बोलताना ते म्हणाले, “याबाबत मला माहिती नाही. मात्र मला वाटत कि प्रत्येक खासदाराच्या मतदारसंघात विकास झाला पाहिजे. ज्यांना आमच्या विचारधारेवर आणि एकनाथ शिंदेंवर विश्वास आहे, बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्याची मनात इच्छा असेल तर त्यांचं स्वागत आहे. त्यांच्यासाठी 24 यास 365 दिवस दरवाजे उघडे आहेत,” असे ते म्हणाले.
येत्या 19 जून रोजी शिवसेनेचा 60 वा वर्धापन दिन साजरा करण्यात येणार आहे. शिवसेनेच्या वर्धापनदिनी आमदार आणि खासदारांची संख्या वाढलेली दिसेल का? यावं प्रश्नावर उत्तर देत ते म्हणाले, “पुढे काय होतंय पाहू, आज यावर काही बोलू शकत नाही. एखादा निर्णय झाला आणि आमची संख्या वाढली तर ती आमच्यासाठी चांगली बाब आहे,” असे ते म्हणाले.
कथित खासदारफुटीच्या चर्चांवरून शिवसेना ठाकरे गटाकडून खासदारांची बैठक पार पडली होती. आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडून आमदारांची बैठक बोलावण्यात आली आहे. सोमवारी 22 जून रोजी दुपारी चार वाजता हि मिटिंग ठेवण्यात आली असून मंत्रालयासमोरील ‘शिवालय‘ येथे हि बैठक पार पडणार आहे. या बैठकीत विधिमंडळ पक्षाच्या विधानसभा आणि विधानपरिषदेच्या सर्व सदस्य सहभागी होणार आहेत. या बैठकीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत .






