Chiplun News: 'चिपळूणातील भाजपचे हे कार्यालय आगामी काळात बनेल सत्ताकेंद्र'; प्रमोद जठार
Chiplun News: “चिपळूणमधील गल्लीत असलेली भाजप जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांनी हायवेवर आणली आहे. आता हायवेवरून प्रशांत यादव थेट विधानभवनात प्रवेश करतील आणि पुढील मंत्रिमंडळात मंत्री म्हणून काम करतील,” असा विश्वास भाजप नेते आमदार प्रमोद जठार यांनी व्यक्त केला. ‘आता थांबायचे नाही, शतप्रतिशत भाजप हेच ध्येय ठेवून आजपासूनच कामाला लागा,’ असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.
भारतीय जनता पार्टीचे रत्नागिरी दक्षिणचे जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या मुंबई-गोवा महामार्गावरील कुरनेश्वर पाग येथील नूतन जनसंपर्क कार्यालयाचा उद्घाटन सोहळा रविवारी सायंकाळी अत्यंत दिमाखात संपन्न झाला. आमदार प्रमोद जठार यांच्या हस्ते फित कापून कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले, तर मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून फटाक्यांच्या प्रचंड आतिषबाजीत कार्यालयाचा शुभारंभ झाला.
यावेळी बोलताना आमदार जठार म्हणाले की, पक्ष आणि कार्यकर्ते यांच्या बळावरच मी आमदार आहे. कार्यकर्त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि सर्वसामान्यांच्या सेवेसाठी हे कार्यालय नवसंजीवनी ठरेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा १२ वर्षांचा कार्यकाळ आणि अहोरात्र काम करण्याचा आदर्श प्रत्येक कार्यकर्त्याने समोर ठेवावा. नरेंद्रचार्याजी महाराजांचे आशीर्वाद प्रशांत यादव यांच्या पाठीशी असल्याने त्यांनी आता सुसाट धाव घ्यावी, असेही ते म्हणाले.
जन्म-मृत्यू नोंदणीचा केंद्रीय सर्व्हर ठप्प! जिल्ह्यात दाखला वितरण खोळंबले; पूर्वसूचना नसल्याने
जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, रत्नागिरीत मुख्य कार्यालय असले तरी चिपळूण आणि आजूबाजूच्या तालुक्यातील जनतेशी व कार्यकर्त्यांशी समन्वय साधण्यासाठी महामार्गावरील हे कार्यालय मध्यवर्ती केंद्र ठरेल. या कार्यालयाच्या माध्यमातून आगामी काळात जिल्ह्यात शतप्रतिशत भाजप दिसेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या सोहळ्याला वाशिष्ठी डेअरीच्या स्वप्ना यादव, स्मिता सुभाषराव चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष बळीराम मोरे, स्वानंद रानडे, सुप्रियाताई उतेकर, लियाकत शहा, अजित निकम, विनोद भुरण, शशिकांत मोदी, जिल्हा कार्यकारणी सदस्य चंद्रकांत जाधव, योगेश शिर्के, विजय देसाई, अन्वरभाई जबले, शामूनभाई घारे, प्रथमेश शिंदे, जनार्दन पवार यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. रुपाली दांडेकर यांसह भाजपचे अनेक नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.






