(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
मराठी नाट्यसृष्टीचा मोठा आणि दिमाखदार सोहळा म्हणजे ‘झी नाट्यगौरव पुरस्कार २०२६’. यंदा हा सोहळा खूप उत्साहात पार पडला. यावेळी सोहळ्याची थीम होती मराठी नाटकांचा दौरा, ज्यात नाटकांच्या गमती-जमती, किस्से आणि अनुभव सुंदरपणे मांडले गेले.या वर्षीचा जीवनगौरव पुरस्कार जेष्ठ लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना देण्यात आला. २२ मार्चपासून मराठी नाटकांचा दिमाखदार दौरा सुरू होणार आहे.
लेखिका-दिग्दर्शिका सई परांजपे यांचा गोष्ट रचण्याचा प्रवास खूपच खास आहे. लहानपणी आई त्यांना झोपवताना गोष्टी सांगायची. पण एकदा आईला कंटाळा आल्यावर तिने सईला म्हणाले, “आज तूच गोष्ट सांग बरं.” त्या दिवशी सईने आईला इतकी छान गोष्ट सांगितली की आईची झोपच उडाली. त्यापासूनच तिचा गोष्ट लिहिण्याचा प्रवास सुरू झाला.सईंच्या आई लेखिका आणि वडील चित्रकार असल्यामुळे घरात नैसर्गिक रंगभाषा आणि कथा सांगण्याची सवय होती. आईने सईला केवळ झोपण्यापूर्वीच्या गोष्टीपुरत्या न ठेवता, रोज दोन पानं लिहिण्याची सवय लावली.अवघ्या आठ वर्षांच्या वयातच सई परांजपे यांनी आपले पहिले पुस्तक ‘मुलांचा मेवा’ प्रकाशित केले. हे पुस्तक त्यांच्या प्रतिभेची पहिली ठळक नोंद ठरली.
“मुलं लहान वयापासून सुंदर लिखाण करू शकतात, पण दुर्दैव असं की त्यांना शकुंतला परांजपे नावाची आई लाभत नाही,” हे तुमचं वाक्य तुमच्या कलाजीवनात आईचं स्थान किती मोठं आहे हे अधोरेखित करतं.
आई शकुंतला परांजपे आणि आजोबा रॅंगलर परांजपे यांच्या देखरेखीखाली पुण्यात काटेकोर शिस्तीत झालेली तुमची जडणघडण, पुढे तुमच्या बहुआयामी कारकिर्दीचा भक्कम पाया ठरली. कॉलेजमध्ये असताना आकाशवाणी पुणे केंद्रावर ‘निवेदिका’ म्हणून तुमचा प्रवास सुरू झाला. ‘बालोद्यान’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने तुम्ही अनेक बालनाटके लिहिली, बसवली आणि सादर केली. याच प्रयत्नांतून बालरंगभूमीची कल्पना प्रत्यक्षात उतरली. ‘पत्तेनगरी’ पासून सुरू झालेला हा प्रवास पुढे ‘शेपटीचा शाप’, ‘जादूचा शंख’, ‘झाली काय गंमत’, ‘भटक्यांचे भविष्य’, ‘हरवलेल्या खेळण्यांचे राज्य’, ‘पक्ष्यांचं कविसंमेलन’, ‘देवाची फुलं’, ‘सळो की पळो’, ‘माझा खेळ मांडू दे’ अशा अनेक अविस्मरणीय नाटकांपर्यंत विस्तारला.
‘पत्तेनगरी’च्या प्रयोगाला भारताचे तत्कालीन मंत्री श्री. बाळकृष्ण केशकर प्रमुख पाहुणे होते. बालरंगभूमीचा बोलबाला इतका वाढला की एकदा तर यशवंतराव चव्हाण आणि खुद्द पंडित नेहरूही नाटकाला आले होते. पुढे तुम्ही ‘एक तमाशा अच्छा खासा’, ‘गीध’, ‘धिक् ताम्’, ‘पुन्हा शेजारी’, ‘जास्वंदी/पंजे’, ‘आलबेल’, ‘सख्खे शेजारी’, ‘बिकट वाट वहिवाट’ अशी अनेक नाटके यशस्वीरित्या रंगमंचावर आणलीत. लग्नानंतर तुम्ही नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा इथे नाटक शिकायला गेलात. पुढे शिष्यवृत्ती मिळवून तुम्ही पॅरिसच्या रंगभूमीवरून अनेक गोष्टी शिकून आलात. रंगभूमीव्यतिरिक्त चित्रपट, साहित्य, दूरदर्शन, रेडिओ, माहितीपट — ह्या सगळ्या विश्वांमधलं तुमचं योगदान आणि कारकीर्द अत्यंत महत्त्वाची आणि अभूतपूर्व आहे.
नसीरुद्दीन शहा, फारुख शेख, दीप्ती नवल, शबाना आझमी, नाना पाटेकर, ओम पुरी, रघुवीर यादव, निळू फुले अशा अनेक दिग्गज कलाकारांना सोबत घेऊन, तुमच्या दिग्दर्शनाखाली हिंदी सिनेमाला एक नवा, संवेदनशील आणि आशयघन अध्याय लाभला. तबलावादक झाकीर हुसैन यांच्या वादनाने डोळे मिटून मंत्रमुग्ध होणारे आम्ही सगळेचं आहोत, पण डोळे उघडून त्यांच्यात सिनेमातला नायक पाहू शकला ते तुम्हीच. पद्मभूषण ते राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार असे कितीतरी सर्वोच्च पुरस्कार तुम्हाला लाभले, पण त्याहीपेक्षा रसिकांच्या मनातलं तुमचं ‘अढळ’स्थान अधिक उंच आहे. गल्लाभरू कामापेक्षा तुमची नाटके आणि सिनेमे हे ‘कलात्मक’ आणि ‘करमणूकप्रधान’ अधिक होते, आणि म्हणूनच ते आजही महत्त्वाचे ठरतात.
लेखिका-दिग्दर्शिका सई परांजपे यांची कथा आणि नाट्यसृष्टीतली शैली अत्यंत खास आहे. त्यांच्या तिरकस शैलीतून माणसांच्या आयुष्याची गूढता आणि साधेपणा दोन्ही अनुभवायला मिळतात. ‘खिडकीतल्या मांजराला’ वाचताना असं वाटतं की त्या मांजराला खरंच जगातले किती रंग, भीती, आनंद दिसत असतील.
सईंच्या निखळ हसण्याने आणि मांजरागत काचडोळ्यांमधून माणसांशी आपलेपण जुळते, भीतीही सोबत वाटते. अनेक क्षेत्रांत पसरलेल्या त्यांच्या सर्जनशीलतेचे हे ‘इवलंस रोप’ अनेक फांद्यांनी भरलेले आहे.सईबाई, तुम्ही खरंच कधीही न कोसळणारी आणि भव्य ‘पत्तेनगरी’ रचली आहे. त्यांच्या प्रदीर्घ, बहुआयामी आणि देदीप्यमान नाट्यकारकीर्दीला झी नाट्यगौरवकडून मानाचा मुजरा देण्यात आला आहे.






