( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
मराठी चित्रपटसृष्टीत मैत्री, मस्ती आणि भन्नाट मनोरंजनाचा फुल ऑन डोस घेऊन ‘मामाच्या गोव्याला जाऊया’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच त्याच्या टीझरने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला असून प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.बालगंधर्व परिवार ट्रस्ट आणि पुणे महानगरपालिका आयोजित ‘बालगंधर्व रंगमंदिर’च्या ५८ व्या वर्धापन दिन सोहळ्यात हजारो प्रेक्षकांच्या उपस्थितीत या टीझरचे भव्य अनावरण करण्यात आले. यावेळी चित्रपटातील कलाकार आणि प्रेक्षकांमध्ये रंगलेल्या संवादामुळे कार्यक्रमाला वेगळीच रंगत आली.
याप्रसंगी चित्रपटाचे दिग्दर्शक विजू माने यांच्यासह मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचे कलाकार अंकुश चौधरी, कुशल बद्रिके, संतोष जुवेकर, अभिजित चव्हाण आणि प्रवीण तरडे यांच्या सोबत जबरदस्त संवाद रंगला. या चित्रपटाचा टीझर पाहिल्यावर, हा चित्रपट म्हणजे प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचा फुल ऑन राडा असणार अशी प्रतिक्रिया उपस्थितांनी यावेळी व्यक्त केली.
टीझरची सुरुवातच एका भन्नाट आणि नॉस्टॅलजिक गोव्याच्या वाईब्सने होते. यात ‘स्ट्रगलर साला’चे तीन जिगरी मित्र कुशा, बाबा आणि संत्या आणि त्यात नव्याने सहभागी झालेला मामा दिसतोय. मराठीतील मनोरंजनाचे चार हुकमी एक्के म्हणजेच अंकुश चौधरी, कुशल बद्रिके, अभिजीत चव्हाण आणि संतोष जुवेकर एकत्र आल्यावर पडद्यावर काय राडा होऊ शकतो, याची झलक या टीझरमध्ये पाहायला मिळते. मित्रांची जुनी मैत्री, गोव्याची ट्रिप, त्यात येणारे मजेशीर ट्विस्ट आणि टर्न्स आणि सोबतीला कडक बॅकग्राउंड म्युझिक यामुळे हा टीझर सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
दिग्दर्शक विजू माने यांनी सांगितले की, हा चित्रपट प्रत्येक मित्रांच्या ग्रुपशी जोडला जाईल. मैत्री, आठवणी, गोंधळ आणि भरपूर हशा यांचा संगम असलेला हा चित्रपट प्रेक्षकांना दोन तासांची धमाल सफर घडवणार आहे.
‘विजुमेनिया प्रा. लि.’ आणि ‘लाईट अँड शेड’ प्रस्तुत या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती विजू माने यांनी केली आहे. तर पटकथा आणि संवाद लेखनात राहुल आवटे आणि कुशल बद्रिके यांची साथ लाभली आहे.मैत्रीचा जल्लोष, गोव्याची मजा आणि मनोरंजनाचा तुफान राडा अनुभवण्यासाठी ‘मामाच्या गोव्याला जाऊया’ हा चित्रपट ३१ जुलैपासून चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.






