(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Bhata Marathi Movie मराठी चित्रपटसृष्टीत सामाजिक आशयाचे विषय प्रभावीपणे मांडण्याची परंपरा कायम आहे. त्याच परंपरेला पुढे नेत ‘भाटा’ हा आगामी मराठी चित्रपट बेलदार या भटक्या जमातीच्या संघर्षमय जीवनावर प्रकाश टाकणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले (मंत्री, सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, लातूर) यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. हा चित्रपट २८ ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
‘भाटा’ हा चित्रपट बेलदार समाजाच्या कष्टमय आयुष्याची कथा मांडतो. दगड फोडून उदरनिर्वाह करणाऱ्या या भटक्या समाजातील लोकांचे संघर्ष, त्यांची स्वप्ने आणि सामाजिक वास्तव चित्रपटातून उलगडणार आहे. चित्रपटातील ‘राणा’ हे पात्र आपल्या मुलीला शिक्षण देऊन मोठे करण्याचे स्वप्न पाहते. मात्र, सामाजिक बंधने आणि प्रतिकूल परिस्थितीत तो हे स्वप्न पूर्ण करू शकतो का, याची हृदयस्पर्शी कहाणी चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी, अरुण नलावडे, विजय कदम, अनिल नगरकर, लक्ष्मण देवभट, प्रशांत मोहिते, अभिनेत्री रुपाली जाधव, प्रेमा किरण आणि बालकलाकार तनिष्का जाधव यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.
व्ही. डी. एंटरटेनमेंट आणि मोरया उद्योग समूह प्रस्तुत तसेच अरायव्हल स्टुडिओ प्रा. लि. निर्मित ‘भाटा’ या चित्रपटाचे निर्माते सुनील आबा जाधव आणि विजय चंद्रकांत चव्हाण आहेत. रिजवान शेख, नितेश पराडकर आणि सुनील कातकर हे सहनिर्माते आहेत.
चित्रपटाचे दिग्दर्शन भरतराज नारायण यादव यांनी केले असून अक्षय सुतार यांनी सहदिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे. कथालेखन विजय चंद्रकांत चव्हाण यांचे असून पटकथा आणि संवाद शरद कारंडे यांनी लिहिले आहेत. गीत आणि संगीताची धुरा श्रेयस आंगणे यांनी सांभाळली असून छायाचित्रण हरेश सावंत यांचे आहे.
बेलदार समाजाच्या वेदना, संघर्ष आणि स्वप्नांना पडद्यावर आणणारा ‘भाटा’ हा चित्रपट २८ ऑगस्ट २०२६ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार असून, सामाजिक आशय असलेल्या चित्रपटांची आवड असलेल्या प्रेक्षकांसाठी तो एक वेगळा अनुभव ठरण्याची शक्यता आहे.






