(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
या चित्रपटाच्या माध्यमातून महाभारतातील पराक्रमी योद्धा बर्बरीक यांचा असामान्य प्रवास मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. धार्मिक परंपरेनुसार बर्बरीक हे भीमाचे नातू आणि घटोत्कचाचे पुत्र होते. त्यांच्या त्यागानंतर भगवान श्रीकृष्णांनी त्यांना कलियुगात पूजले जाण्याचा वर दिल्याची मान्यता आहे. त्यामुळे पुढे त्यांची खाटू श्याम बाबा म्हणून भक्तिभावाने पूजा केली जाऊ लागली.
खाटू श्याम बाबांना भक्त प्रेमाने ‘हारे का सहारा’ म्हणजेच आशा गमावलेल्यांचा आधार, असं संबोधतात. राजस्थानमधील सीकर जिल्ह्यातील खाटू येथील त्यांचं मंदिर हे देशातील प्रमुख श्रद्धास्थानांपैकी एक आहे. देशभरातून तसेच परदेशातूनही भाविक या मंदिराला भेट देतात.
‘हारे का सहारा, बाबा खाटू श्याम हमारा’ या चित्रपटातून बर्बरीक यांच्या जीवनप्रवासासोबतच त्याग, श्रद्धा, आशा आणि समर्पण या भावनांचा वेध घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
अबंडंटिया एंटरटेनमेंट आणि सिलेक्ट मीडिया यांचं हे सहकार्य केवळ भव्य सिनेमॅटिक अनुभवापुरतं मर्यादित नसून कथेमागील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक संदर्भ अस्सल पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न असणार आहे. निर्मात्यांच्या मते, श्रद्धा आणि आशेची ही कथा भौगोलिक सीमा, पिढ्या आणि परिस्थितीच्या पलीकडे जाणारी आहे.
अबंडंटिया एंटरटेनमेंटचे संस्थापक आणि CEO विक्रम मल्होत्रा यांनीही या प्रकल्पाबद्दल आपली भूमिका व्यक्त केली. राजस्थानमध्ये वाढताना श्याम बाबांवरील लोकांची श्रद्धा त्यांनी जवळून पाहिली असल्याचं त्यांनी सांगितलं. भाविक ज्या विश्वासाने आणि समर्पणाने बाबांकडे पाहतात, त्याच भावनेने ही कथा मोठ्या पडद्यावर मांडण्याची इच्छा असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
अबंडंटिया एंटरटेनमेंटने याआधीही भारतीय संस्कृती, कुटुंब आणि परंपरेशी जोडलेल्या प्रभावी कथा मांडण्यावर भर दिला आहे. ‘हारे का सहारा, बाबा खाटू श्याम हमारा’च्या माध्यमातूनही भारतीय श्रद्धा आणि सांस्कृतिक वारसा व्यापक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी कोण सांभाळणार, तसेच कलाकार आणि निर्मितीशी संबंधित इतर माहिती अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. या संदर्भातील अधिकृत घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे.
‘हारे का सहारा, बाबा खाटू श्याम हमारा’ हा चित्रपट २०२७ मध्ये चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असून, खाटू श्याम बाबांच्या भक्तांसह भारतीय पौराणिक कथांमध्ये रस असलेल्या प्रेक्षकांचं लक्ष या चित्रपटाकडे लागलं आहे.






