(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Zee Marathi Serial: ‘झी मराठी’वरील आपल्या आवडत्या मालिकांमध्ये पुढे काय घडणार, याची उत्सुकता प्रेक्षकांना नेहमीच असते. कोणत्या पात्राच्या मनातील भावना व्यक्त होणार, कोणतं रहस्य उलगडणार आणि कोणाचं मिशन यशस्वी होणार, याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलेलं असतं. या आठवड्यात ‘दीपज्योती’, ‘तारिणी’ आणि ‘देवमाणूस-मधला अध्याय’ या मालिकांमध्ये प्रेम, संघर्ष, धाडस आणि रहस्याचे अनेक पदर उलगडणार आहेत.
‘दीपज्योती’मध्ये दीपच्या नव्या व्यवसायासमोर स्थानिक खंडणीखोरांचं आव्हान उभं राहणार आहे. या संकटाच्या वेळी ज्योती दीपला वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालते. या घटनेमुळे दीपच्या आयुष्यात ज्योतीचं स्थान किती खास आहे, याची जाणीव अधिक तीव्र होणार आहे.
दरम्यान, दीप ज्योतीची रिक्षा परत मिळवून देतो. या प्रसंगामुळे दोघांच्या नात्यातील जवळीक आणखी वाढताना दिसणार आहे. दीपच्या मित्रांनाही त्याच्या वागण्यात झालेला बदल जाणवतो. ज्योतीबद्दल दीपच्या मनात प्रेम निर्माण झाल्याचं त्यांच्या लक्षात येतं. मात्र दीप अद्याप आपल्या भावनांचा स्वीकार करण्यास तयार नाही.
गोकुळाष्टमीच्या दिवशी मात्र दीपच्या मनातील भावना आणखी स्पष्ट होण्याची शक्यता आहे. त्याच्या स्वभावातील सकारात्मक बदल पाहून आत्यालाही त्याच्या आयुष्यात एखादी खास मुलगी आली असल्याचा संशय येतो. आता दीपच्या बदलामागे ज्योतीच आहे, हे आत्याला समजणार का, याची उत्सुकता आहे.
‘तारिणी’ मालिकेत सध्या मिशनचा थरार पाहायला मिळत आहे. मुलींना शहरातील महत्त्वाच्या ठिकाणांची ओळख करून घेण्यासाठी जोड्यांमध्ये संपूर्ण शहरात पाठवलं जातं. या संधीचा उपयोग तारिणी मिशनसाठी आवश्यक असलेली महत्त्वाची माहिती पुढे पोहोचवण्यासाठी करते.
मात्र, दुसरीकडे तारिणी कुठे आहे याची चिंता केदारला सतावत आहे. त्याचवेळी मुंबईत जे.जे.ची नजर तारिणीवर पडते. तिला मुंबईत पाहिल्यानंतर तारिणी अजूनही शहरातच असल्याची जे.जे.ला खात्री पटते.
त्यामुळे तारिणीसमोरील धोका आणखी वाढणार आहे. एका बाजूला मिशन पूर्ण करण्याची जबाबदारी आणि दुसरीकडे जे.जे.ची नजर, अशा परिस्थितीत तारिणी आपलं मिशन कसं पूर्ण करणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
‘देवमाणूस-मधला अध्याय’मध्ये रहस्य आणखी गडद
‘देवमाणूस-मधला अध्याय’मध्ये तपासाला नवं वळण मिळणार आहे. डिंपल अजितचा फोन गुपचूप गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकमध्ये ठेवते. त्यानंतर या फोनचं लोकेशन गोव्यात ट्रेस होतं. फोन गोव्यात सापडल्यामुळे जामकरच्या मनातील संशय आणखी वाढतो.
दुसरीकडे, तेजश्री आश्रमाबाबत जामकरला महत्त्वाची माहिती देते. मात्र ही माहिती पुरेशी नसल्याचं जामकरला वाटतं. त्यामुळे या प्रकरणातील ठोस पुरावे गोळा करण्यासाठी तो तेजश्रीला प्रयत्न करण्यास सांगतो.
आता आश्रमात नेमकं काय सुरू आहे, अजितच्या फोनचं लोकेशन गोव्यात कसं पोहोचलं आणि या सगळ्यामागचं रहस्य काय आहे, याचा शोध घेताना तपास कुठल्या दिशेने जाणार, हे मालिकेच्या आगामी भागांत पाहायला मिळणार आहे.
एकीकडे दीप-ज्योतीच्या नात्यात उमलणाऱ्या प्रेमाची चाहूल, दुसरीकडे तारिणीच्या मिशनसमोर उभा राहिलेला धोका आणि ‘देवमाणूस-मधला अध्याय’मधील गूढ तपास, यामुळे ‘झी मराठी’वरील हा आठवडा प्रेक्षकांसाठी नक्कीच उत्कंठावर्धक ठरणार आहे.






