(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
Kapuskonda Movie: मराठी चित्रपटसृष्टीत सध्या विविध विषयांवर आधारित चित्रपटांची पर्वणी पाहायला मिळत आहे. अशातच माणूस आणि प्राणी यांच्यातील भावभावना, नातेसंबंध आणि आपुलकीचे धागे मनोरंजक पद्धतीने उलगडणारा ‘कापूसकोंडा’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रक्षाबंधनाच्या खास निमित्ताने या चित्रपटाची पहिली झलक सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आली असून, ती पाहिल्यानंतर चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.
‘कापूसकोंडा’ हा चित्रपट येत्या २३ ऑक्टोबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या पहिल्या झलकमध्ये दिसणाऱ्या काही प्रसंगांनी कथानकाबाबत कुतूहल निर्माण केलं आहे.
‘कापूसकोंडा’मध्ये ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर आणि अभिनेत्री मधुराणी गोखले पुन्हा एकदा एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. यापूर्वी सचिन पिळगावकर यांच्या ‘नवरा माझा नवसाचा’ या चित्रपटात मधुराणी यांनी ‘कँडी’ ही मजेशीर भूमिका साकारली होती.
आता अनेक वर्षांनंतर ही जोडी ‘कापूसकोंडा’च्या माध्यमातून पुन्हा प्रेक्षकांसमोर येत आहे. त्यांच्यासोबत नवीन पिढीतील अभिनेत्री अक्षता पाडगांवकर, जान्हवी तांबट आणि अभिनेता भूषण पाटील यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
‘कापूसकोंडा’च्या पहिल्या झलकची सुरुवात “कापूसकोंड्याची गोष्ट ऐकली का?” या व्हॉइसओव्हरने होते. त्यानंतर मधुराणी गोखले आणि दोन मुली आश्चर्याने पाहताना दिसतात.
पुढील दृश्यात भांडीकुंडी अस्ताव्यस्त पसरलेल्या खोलीत सचिन पिळगावकर दिसतात. विशेष म्हणजे, त्यांच्या मांडीवर कुत्रा असून ते काहीसे भेदरलेले दिसत आहेत. या दोन दृश्यांमधूनच चित्रपटाची कथा नेमकी काय आहे, याबाबत प्रेक्षकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात.
माणूस आणि प्राणी यांच्यातील नातं, कुटुंबातील भावनिक गुंतागुंत आणि मानवी नातेसंबंध यांची हळवी गोष्ट या चित्रपटातून मांडण्यात आली आहे. त्यामुळे चित्रपटाची पहिली झलक प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणारी ठरली आहे.
‘कापूसकोंडा’च्या कथानकाची गरज लक्षात घेऊन चित्रपटाचं बरंचसं चित्रीकरण लातूर जिल्ह्यातील अंधोरी या गावात करण्यात आलं आहे. ग्रामीण पार्श्वभूमी आणि कथानकातील भावनिक पैलू यामुळे चित्रपटाला वेगळं स्वरूप मिळाल्याचं पाहायला मिळतं.
पॅनोरामा स्टुडिओज प्रस्तुत आणि व्हीपी माऊली ग्रुप ऑफ कंपनीज यांच्या सहकार्याने स्टोरीवाला फिल्म हा चित्रपट सादर करत आहे. जास्वंद एंटरटेन्मेंट्स प्रा. लि. यांनी ‘कापूसकोंडा’ची निर्मिती केली आहे.
चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन सचिन मोहिते यांनी केलं आहे. सचिन मोहिते, गणेश पंडित आणि ऋषिकेश तुरई यांनी पटकथा व संवादलेखनाची जबाबदारी सांभाळली आहे. सचिन पाटेकर यांनी छायांकन केलं आहे.
चित्रपटातील गाण्यांना संगीतकार ए. व्ही. प्रफुल्लचंद्र यांनी संगीतबद्ध केलं असून, पार्श्वसंगीत अभिजीत हेगडेपाटील यांचं आहे. गायक अवधूत गुप्ते आणि पद्मनाभ गायकवाड यांच्या आवाजाने चित्रपटातील गाणी सजली आहेत. ध्वनी तंत्रज्ञ म्हणून सुहास राणे यांनी काम पाहिलं आहे.
भावनिक कथानकाला दमदार कलाकारांची साथ आणि माणूस-प्राणी नात्याची वेगळी मांडणी यामुळे ‘कापूसकोंडा’ हा चित्रपट प्रेक्षकांसाठी एक वेगळा अनुभव ठरण्याची शक्यता आहे. आता २३ ऑक्टोबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आल्यानंतर कथानक नेमकं कोणतं वळण घेतं, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.






