( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)
Singer Mukesh Ji : भारतीय संगीतविश्वातील अजरामर स्वर म्हणून ओळखले जाणारे दिवंगत गायक मुकेश यांच्या स्मृतीला चिरंतन उजाळा देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने ‘स्वर्गीय गायक मुकेश गौरव समिती’ स्थापन करण्यात आली आहे. येत्या २७ ऑगस्ट २०२६ रोजी मुकेश यांची ५० वी पुण्यतिथी असून, त्यांच्या संगीत वारशाचे जतन आणि संवर्धन करण्यासोबतच नवोदित गायक-कलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी समितीच्या माध्यमातून विविध सांस्कृतिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
मुंबई शहर जिल्ह्यात स्थापन करण्यात आलेल्या या समितीच्या अध्यक्षपदी महाराष्ट्र राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना गटनेता अमेय घोले आणि प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता नील नितीन मुकेश हे समितीचे सदस्य आहेत. तर मुंबई शहर जिल्हाधिकारी हे समितीचे सदस्य सचिव म्हणून काम पाहणार आहेत.
दिवंगत गायक मुकेश यांनी आपल्या सुमधुर आवाजातून भारतीय संगीतविश्वात अढळ स्थान निर्माण केले. हिंदी चित्रपटसृष्टीसोबतच मराठी गीतांच्या माध्यमातून त्यांनी भारतीय संस्कृती, संगीत परंपरा आणि राष्ट्रीय एकात्मतेला महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांच्या आवाजाची जादू आजही संगीतप्रेमींच्या मनात कायम आहे.
त्यांचा समृद्ध संगीत वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे, त्यांच्या स्मृती जतन करणे आणि संगीत क्षेत्रातील नव्या प्रतिभेला संधी देणे हा समितीचा प्रमुख उद्देश आहे.
समितीच्या माध्यमातून नवोदित गायक, संगीत विद्यार्थी आणि होतकरू कलाकारांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. त्यांना आपल्या कलागुणांचे सादरीकरण करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासोबतच त्यांच्या प्रतिभेला प्रोत्साहन देण्यात येणार आहे.
याबाबत समितीचे अध्यक्ष तथा मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले की, मुकेश यांच्या स्मृती जतन करण्यासोबतच नवोदित गायक आणि कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणे आणि संगीत क्षेत्रातील नव्या प्रतिभेला संधी देणे हा समितीचा प्रमुख उद्देश आहे. विविध सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून मुकेश यांच्या संगीत वारशाला अभिवादन करण्यात येईल.
गायन स्पर्धा आणि संगीत महोत्सवाचे आयोजन
समितीच्या माध्यमातून नवोदित गायक आणि संगीत विद्यार्थ्यांसाठी विशेष गायन स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. याशिवाय मुकेश यांच्या हिंदी आणि मराठी गीतांवर आधारित सांगीतिक संध्या आणि संगीत महोत्सव आयोजित केले जाणार आहेत.
संगीत क्षेत्रातील युवा प्रतिभेला प्रोत्साहन देण्यासाठी शिष्यवृत्ती आणि पुरस्कार देण्याची योजनाही समितीच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहे. होतकरू कलाकारांना आर्थिक मदत आणि प्रोत्साहन देऊन त्यांना संगीत क्षेत्रात पुढे जाण्यासाठी संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
मुकेश यांच्या ५० व्या पुण्यतिथीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने उचललेले हे पाऊल त्यांच्या अमूल्य संगीत वारशाचे जतन करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.






