( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Sneha Wagh: टीव्ही अभिनेत्री स्नेहा वाघ हिच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले आहेत. नुकतीच ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. दोन अपयशी विवाहांनंतर आता तिला नात्यांपेक्षा भगवान श्रीकृष्णाच्या भक्तीत अधिक समाधान मिळत असल्याचं अभिनेत्रीने सांगितलं आहे. अभिनय क्षेत्रात सक्रिय असलेली स्नेहा तिचा बराचसा वेळ वृंदावन आणि मथुरेतील छटिकरा येथे घालवते.
नुकतीच ‘महादेव अँड सन्स’ या शोच्या प्रमोशनसाठी स्नेहा लखनौमध्ये गेली होती. यावेळी तिने आपल्या वैयक्तिक आयुष्याबरोबरच अध्यात्माकडे वळण्याच्या प्रवासाबद्दल मनमोकळेपणाने भाष्य केलं.
स्नेहाने सांगितलं की, आयुष्यातील एका टप्प्यावर तिचा लोकांवरील विश्वास कमी होऊ लागला होता. प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या प्रकारे स्वतःच्या स्वार्थासाठी काम करत असल्याची भावना तिच्या मनात निर्माण झाली होती. याच काळात तिने अध्यात्माचा मार्ग स्वीकारला.
अभिनेत्रीच्या मते, ईश्वराशी एकरूप झाल्यानंतर तिला अशी शांतता मिळाली, जिच्या शोधात ती बऱ्याच काळापासून होती. त्यामुळे मुंबईच्या झगमगत्या दुनियेपेक्षा आता तिला वृंदावनची शांतता अधिक जवळची वाटते.
Govinda Video: तोंडावर मास्क अन् चेहऱ्यावर थकवा; गोविंदा रुग्णालयातून बाहेर पडतानाचा VIDEO व्हायरल
स्नेहाच्या वृंदावन प्रवासाची सुरुवातही काहीशी अनपेक्षित होती. तिला एका मंदिरातून निमंत्रण मिळालं होतं. सुरुवातीला हे निमंत्रण फसवणूक तर नाही ना, अशी शंका तिच्या मनात आली होती. मात्र, वृंदावनला पोहोचल्यानंतर तिचा अनुभव पूर्णपणे वेगळा ठरला.
स्नेहाने सांगितलं की, तिथे अवघे तीन दिवस राहिल्यानंतरच तिला वेगळ्या प्रकारची शांतता जाणवली. कदाचित मुंबईत राहणं आपल्या नशिबात नाही, असंही तिला त्या वेळी वाटलं. कृष्णभक्तीतून मिळणारा आनंद आणि निरपेक्ष प्रेमाची अनुभूती तिच्यासाठी अत्यंत खास असल्याचं ती सांगते.
दोन अपयशी संसारांनंतर स्नेहाला सध्या कोणत्याही नात्याची गरज वाटत नसल्याचं तिने स्पष्ट केलं. तिच्या मते, भगवान श्रीकृष्णाने तिच्या आयुष्यातील भावनिक गरजा पूर्ण केल्या आहेत आणि त्यामुळे तिच्या आनंदासाठी आता इतर कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता तिला वाटत नाही.
सध्या ती स्वतःमध्ये खूप आनंदी आणि समाधानी असल्याचंही अभिनेत्रीने सांगितलं.
दोन अयशस्वी विवाहांनंतर स्नेहाने पुन्हा लग्न करण्याचा विचार कायमचा सोडून दिला आहे का, असा प्रश्न तिला विचारण्यात आला. यावर अभिनेत्रीने लग्नाचे दरवाजे पूर्णपणे बंद केलेले नसल्याचं स्पष्ट केलं.
मात्र, सध्या लग्न हे तिच्या आयुष्याचं केंद्र नाही. भविष्यात काय होईल, याचा निर्णय आत्ताच घेण्याच्या मनःस्थितीत ती नाही. आयुष्याला त्याचा मार्ग स्वतः दाखवू द्यावा, असा तिचा दृष्टिकोन आहे.
स्नेहाने तिच्या अभिनय कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळाबद्दलही सांगितलं. जेव्हा तिने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं, तेव्हा आजच्या काळाप्रमाणे अभिनयाच्या शाळा आणि प्रशिक्षण केंद्रांची संख्या मोठी नव्हती.
तिला बोलता येत होतं, मात्र कॅमेऱ्यासमोर अभिनय कसा करायचा, हे तिने काम करतानाच शिकून घेतलं. ‘ज्योती’ आणि ‘एक वीर की अरदास…वीरा’ यांसारख्या मालिकांमधील भूमिकांमुळे स्नेहा वाघ घराघरांत पोहोचली.
आज अभिनयासोबतच अध्यात्माकडेही तिचा ओढा वाढला असून वृंदावनातील तिचा हा आध्यात्मिक प्रवास तिच्या आयुष्याला नवी दिशा देताना दिसत आहे.






