सुमंत, पार्थ आणि प्रतीक या त्रिकूटाने गायलंय ‘Boyz4’चं टायटल सॉंग
‘बॉईज’च्या सगळ्या भागांना अवघ्या महाराष्ट्रातून प्रेम मिळाले. धैर्या, ढुंग्या आणि कबीर अनेकांना आपल्यातलेच एक वाटले. आता हे त्रिकुट चौपट धमाल घेऊन ‘बॉईज 4’मधून (Boyz 4) आपल्या भेटीला येत आहेत. नुकतेच या चित्रपटातील टायटल सॉन्ग (Boyz 4 Title Song) एका कार्यक्रमात प्रदर्शित करण्यात आले. प्रत्येकाला थिरकायला लावणारे हे रॅप सॉन्ग (Rap Song) अवधूत गुप्ते यांच्यासह प्रतीक लाड, सुमंत शिंदे आणि पार्थ भालेराव यांनी गायले आहे. त्यामुळे या गाण्याच्या निमित्ताने आता हे त्रिकूट गायकही बनले आहे. अवधूत गुप्ते यांचे जबरदस्त संगीत लाभलेल्या या गाण्याला हृषिकेश कोळी यांनी शब्दबद्ध केले आहे. धैर्या, ढुंग्या आणि कबीर या गाण्यात धमाल करताना दिसत आहेत. या गाण्यातून त्यांचा स्वॅगही दिसत आहे. त्यामुळे ‘बॉईज 4’ची ही नवीन हूक स्टेपही तरुणाईत प्रचलित होईल, हे नक्की !. सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रा. लि. प्रोडक्शन अंतर्गत एव्हरेस्ट एंटरटेनमेंटसह अवधूत गुप्ते (Avadhoot Gupte) प्रस्तुत या चित्रपटाचे लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे, संजय छाब्रिया निर्माते आहेत तर विशाल सखाराम देवरूखकर दिग्दर्शित या चित्रपटाचे लेखन हृषिकेश कोळी यांनी केले आहे. हा चित्रपट 20 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे.