फोटो सौजन्य - Social Media
नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटलने वैद्यकीय क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण यश संपादन करत केनियाहून आलेल्या अवघ्या ७ वर्षांच्या मुलीवर अत्यंत गुंतागुंतीची ‘हॅप्लो-आयडेंटिकल’ बोन मॅरो ट्रान्सप्लांट प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली आहे. ही चिमुरडी ‘हाय-रिस्क FLT3-पॉझिटिव्ह अक्यूट मायलॉइड ल्युकेमिया’ या ल्युकेमियाच्या आक्रमक प्रकाराने ग्रस्त होती.
सदर मुलीवर केनियामध्ये केमोथेरपीची पहिली फेरी राबविण्यात आली होती. मात्र, त्या उपचारांना कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने पुढील उपचारांसाठी तिला नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले. येथे सविस्तर तपासणीनंतर तिच्या आजाराचे स्वरूप अधिक गंभीर असल्याचे निष्पन्न झाले. FLT3-पॉझिटिव्ह अक्यूट मायलॉइड ल्युकेमिया हा वेगाने वाढणारा आणि उच्च जोखमीचा कर्करोग मानला जातो. अशा स्थितीत केवळ औषधोपचार पुरेसे नसून बोन मॅरो ट्रान्सप्लांट आवश्यक ठरतो. मात्र, या प्रक्रियेसाठी पूर्णपणे जुळणारा दाता उपलब्ध नव्हता. त्यामुळे तिच्या आईची ‘हाफ-मॅच्ड’ म्हणजेच ‘हॅप्लो-आयडेंटिकल’ दाता म्हणून निवड करण्यात आली. या निर्णयासमोर मोठे आव्हान होते. कारण मुलीच्या शरीरात दात्याविरोधातील अँटीबॉडीज मोठ्या प्रमाणात आढळून आल्या होत्या. यामुळे प्रत्यारोपित बोन मॅरो नाकारला जाण्याचा, म्हणजेच ‘ग्राफ्ट रिजेक्शन’चा धोका अधिक वाढला होता.
या धोक्याचा सामना करण्यासाठी अपोलो हॉस्पिटलच्या तज्ज्ञ पथकाने विशेष ‘डिसेंसिटायझेशन’ योजना राबवली. या अंतर्गत प्लाझ्मा एक्स्चेंज आणि इम्युनोथेरपीच्या अनेक फेऱ्या देण्यात आल्या. अँटीबॉडीजची पातळी स्वीकारार्ह मर्यादेत आल्यानंतर एप्रिल २०२५ मध्ये त्या चिमुरडीवर हॅप्लो-आयडेंटिकल स्टेम सेल ट्रान्सप्लांट यशस्वीरित्या करण्यात आले. ट्रान्सप्लांटनंतरचा काळही आव्हानात्मक ठरला. मुलीला ‘सीएमव्ही रिएक्टिव्हेशन’ तसेच ‘ग्रेड-३ ग्राफ्ट-वर्सेस-होस्ट डिसीज’चा सामना करावा लागला. मात्र, वेळेवर निदान आणि तातडीच्या उपचारांमुळे या गुंतागुंती नियंत्रणात आणण्यात डॉक्टरांना यश आले. पुढील तपासण्यांमध्ये ‘कम्प्लीट डोनर कायमेरिझम’ आढळून आला, म्हणजेच तिच्या बोन मॅरोमध्ये ल्युकेमियाचा कोणताही अंश उरलेला नाही.
सध्या ट्रान्सप्लांटनंतर सुमारे पाच महिने उलटले असून, ती मुलगी वैद्यकीयदृष्ट्या स्थिर आहे आणि तिच्या प्रकृतीत सातत्याने सुधारणा होत आहे. हे संपूर्ण उपचार अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबई येथील मल्टी-डिसिप्लिनरी टीमने केले. या टीममध्ये डॉ. विपिन खंडेलवाल, डॉ. पुनीत जैन, डॉ. दिपाली पाटील, डॉ. प्रज्ञा तसेच अपोलो चिल्ड्रन्स हॉस्पिटलमधील तज्ज्ञांचा समावेश होता. पूर्णपणे जुळणारा दाता उपलब्ध नसतानाही उच्च-जोखमीच्या बालरोग ल्युकेमियावर यशस्वी उपचार करण्याची अपोलो हॉस्पिटल्सची क्षमता या प्रकरणातून पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.






