संग्रहित फोटो
माजी मंत्री आणि निष्ठावंत शिवसैनिक अशी ओळख असलेले शशिकांत सुतार यांचे पुत्र आणि शिवसेनेचे माजी नगरसेवक पृथ्वीराज सुतार यांच्यासह संजय भोसले यांनी मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मागील निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेत निवडुन आलेला एकही नगरसेवक आता पुण्यात त्यांच्यासोबत राहीलेला नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत नाना भानगिरे गेले. त्यानंतर अविनाश साळवे यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. काही महीन्यांपुर्वी बाळा ओसवाल, विशाल धनवडे, प्राची आल्हाट, संगिता ठोसर, पल्लवी जावळे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेत सुतार आणि भोसले हे दोनच नगरसेवक शिल्लक राहीले होते. त्यांनीही केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार मेधा कुलकर्णी, शहराध्यक्ष धीरज घाटे, गणेश बिडकर यांच्या उपस्थितीत ‘कमळ’ हाती घेतले. हा ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा हादरा मानला जात आहे. नुकतेच माजी नगरसेविका श्वेता चव्हाण यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेत मागील वेळी निवडून आलेला एकही नगरसेवक शिल्लक राहीला नाही.
पक्षाने काय दिले नाही? स्थायी समितीत संधी दिली, गटनेते पद त्यांना दिले. त्यांना स्वत:ने केलेल्या कामावर विश्वास राहीला नाही. महाविकास आघाडीत जिंकलेल्या जागा मिळणारच होत्या, आमच्याकडे नवीन उमेदवार तयार आहेत. – संजय मोरे, शहरप्रमुख
पुण्यात आता अस्तित्वाची लढाई
महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील राजकीय समीकरणे वेगाने बदलत असून, ठाकरेंच्या शिवसेनेला आता या महापालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून अस्तित्वाची लढाई लढावी लागणार आहे. महापालिका निवडणुकीत पक्षाला नवीन चेहऱ्यांना संधी द्यावी लागणार आहे. या नवीन चेहऱ्यांमध्ये कोणाला संधी मिळणार? कोण निवडून येणार याची उत्तरे पुढील काळातच मिळतील. एकेकाळी वीसहून अधिक नगरसेवक असणाऱ्या शिवसेनेला आता पुण्यात पुन्हा पाय रोवण्यासाठी संघटनात्मक आव्हान पेलावे लागणार आहे. तसेच पक्षाच्या नेतृत्वाला पुण्याला दुर्लक्षित करून चालणार नाही.
भाजप-शिवसेनेची युती हिंदुत्वाच्या विचारावर झाली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हिंदुत्वाच्या मुद्यावर देशाला एकत्र आणले आहे, तसेच विकासाचा मोठा अजेंडा राबवला आहे. जगातील सर्वात मोठ्या पक्षात प्रवेश करताना अभिमान वाटत आहे. – पृथ्वीराज सुतार






