सध्याच्या धावपळीच्या जगात सर्वात महाग काय झालं असेल तर ती म्हणजे झोप. ऑफिस, प्रवास आणि घरची कामं यासगळ्यात गृहिणी असो वर्किंग वुमन असो किंवा पुरुष वर्ग देखील शरीराला पाहिजे तितकी झोप होत नाही आणि यामुळे हळूहळू शरीरावर गंभीर परिणाम व्हायला सुरुवात होते. आजकाल फक्त जंकफूडच नाही तर तुमच्या झोपेच्या चुकीच्या पद्धतींमुळे देखील अनेक जणं शारीरिक आणि मानसिकरित्या आजारी पडतात. याबाबत आरोग्यतज्ज्ञ काय म्हणतात ते जाणून घेऊयात…
झोप अपूर्ण होत असेल तर शरीरावर आणि मनावर अनेक नकारात्मक परिणाम दिसून येतात, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, झोपेत शरीरातील पेशी दुरुस्त होतात आणि हार्मोन्सचं संतुलन राखलं जातं. मात्रशी झोप न झाल्यास याचा परिणाम देखील शरीरावर होतो.
जसं की,
एकाग्रता कमी होते: झोपेअभावी मेंदूला योग्य विश्रांती मिळत नाही, त्यामुळे लक्ष केंद्रित करण्यात अडचण येते.
स्मरणशक्ती कमी होते: झोपेत मेंदू माहिती प्रक्रिया करतो, झोप कमी झाली तर आठवण ठेवण्याची क्षमता घटते.
तणाव आणि चिडचिड वाढते: झोपेअभावी मेंदूत तणाव वाढतो याचं कारण म्हणजे हार्मोन्समध्ये होणारे बदल, त्यामुळे सतत अशांत वाटणं किंवा तणाव जाणवत राहतो.
नैराश्य व चिंता वाढते: सतत झोप अपूर्ण राहिल्याने मानसिक आजारांची शक्यता वाढते. या सगळ्यामुळे मानसिक आरोग्याबाबत अनेक आव्हानं दिसून येतात. मानसिक आरोग्याप्रमाणे शारीरिक आरोग्याच्या देखील तक्रारी सुरु व्हायला लागतात.
थकवा आणि अशक्तपणा: शरीराला विश्रांती न मिळाल्याने दिवसभर थकवा जाणवतो.
रोगप्रतिकारक शक्ती कमी होते: झोप अपुरी असल्यास शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते आणि वारंवार सर्दी-खोकला, इन्फेक्शन होऊ शकतात.
वजन वाढणे: अपुरी झोप हार्मोनल असंतुलन निर्माण करते , त्यामुळे भूक जास्त लागते आणि वजन वाढते.
हृदयविकाराचा धोका: झोपेअभावी रक्तदाब आणि हृदयाचा ताण वाढतो, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका निर्माण होतो.
त्वचेवर परिणाम: झोप अपुरी असल्याने त्वचेवर काळी वर्तुळे, कोरडेपणा आणि अकाली सुरकुत्या दिसतात.दररोज ७ ते ८ तासांची झोप प्रौढ व्यक्तींसाठी आवश्यक आहे. झोपेचं वेळापत्रक नियमित ठेवणं, झोपण्यापूर्वी मोबाइलचा वापर टाळणं आणि मन शांत ठेवणं यामुळे झोपेची गुणवत्ता सुधारते, असं तज्ज्ञांकडून सांगितलं जातं.