इस्रायल आणि पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धाची धग काही कमी होताना दिसत नाही आहे. इस्रायलने गाझा पट्टीवर पुन्हा एकदा मोठा हल्ला (Israel Airstrike at Gaza)केला आहे. इस्रायलच्या लष्कराच्या हवाई हल्ल्यात डझनहून अधिक पॅलेस्टिनी ठार झाले आहेत. हवाई हल्ल्यापूर्वीही अमेरिकेने इस्रायलला हल्ले कमी करण्यास सांगितले होते. मात्र अमेरिकेच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलचा हल्ला सुरूच आहे. जबलिया येथे हा हल्ला झाला. या हल्ल्यात अनेक लोक ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहेत.
[read_also content=”देशातील सर्वात मोठी मशीद अयोध्येत बांधली जाईल, पैगंबरांच्या नावावर ठेवण्यात येणार नाव; ‘या’ सर्व सुविधा असणार! https://www.navarashtra.com/latest-news/indias-biggest-mosque-will-build-in-ayodhya-nrps-489267.html”]
वास्तविक, हमास नेत्यांना लक्ष्य करण्यासाठी हा हवाई हल्ला करण्यात आल्याचा दावा इस्रायली लष्कराने केला आहे. इस्त्रायली सैन्याने ओल्ड गाझा स्ट्रीट जबलिया येथील दोन घरांना लक्ष्य केले. या हल्ल्यात 14 पॅलेस्टिनी ठार झाले. या हल्ल्यात डझनभर पॅलेस्टिनी ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहेत. इस्रायली लष्कराने सांगितले की, गाझा शहरातील दोन शाळांमध्ये लपलेल्या दहशतवाद्यांना सैन्याने ठार केले आहे. खान युनिसमधील शस्त्रांनी भरलेल्या अपार्टमेंटवर छापा टाकला. या छाप्यात हमासची भूमिगत ऑपरेटिंग इन्फ्रास्ट्रक्चर सापडली.
गाझा पट्टीवर अंदाधुंद हल्ल्याचा इशारा अमेरिकेने इस्रायलला दिला आहे. तथापि, इशाऱ्यानंतरच, इस्रायलने जबलियावर हवाई हल्ला केला, डझनहून अधिक पॅलेस्टिनी ठार झाले आणि डझनभर अडकून पडले. इस्त्रायलने असे हल्ले करून निष्पाप पॅलेस्टिनींना मारले तर आंतरराष्ट्रीय समर्थन गमावेल, असा इशारा अमेरिकेने दिला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिव्हन यांनी दोन दिवसीय इस्रायलला भेट दिली. पॅलेस्टिनींना टार्गेट करण्याऐवजी केवळ हमासला टार्गेट करा, असे त्यांनी इस्रायलला स्पष्टपणे सांगितले.