poisonous liquor
कल्लाकुरु : तामिळनाडूच्या कल्लाकुरुची जिल्ह्यात विषारी दारू प्यायल्याने 25 जणांना मृत्यू झाला. तर यामध्ये 60 जणांना चक्कर येणे, डोकेदुखी, उलट्या, मळमळ, पोटदुखी आणि डोळ्यांत जळजळ यांसारखा त्रास होऊ लागल्याने त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. सध्या या सर्वांवर उपचार सुरु आहेत.
कल्लाकुरुची जिल्ह्यात एका ठिकाणी या सर्वांनी दारू प्यायली होती. यानंतर काही कालावधीतच यातील काहींना त्रास सुरु झाला. या त्रासानंतर कुटुंबीयांनीही त्यांना तातडीने कल्लाकुरीची शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात नेले.
वैद्यकीय अधिकाऱ्यांनीही परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेता वैद्यकीय उपचार सुरू केले. मात्र, उपचारादरम्यानच 25 जणांचा मृत्यू झाला. 60 हून अधिक लोकांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आलं आहे.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी मंत्री ई. व्ही. वेलू आणि एम. सुब्रमण्यन यांच्यासह कल्लाकुरिची रुग्णालयात जाऊन रुग्णांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
मुख्यमंत्र्यांकडून सीआयडी चौकशीचे आदेश
या प्रकरणानंतर मुख्यमंत्र्यांकडून कल्लाकुरिचीचे जिल्हाधिकारी श्रावण कुमार जदवत यांची बदली करण्यात आली आहे. तर सीआयडीला या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिल्याची माहिती दिली जात आहे.






