नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांनी ‘लिव्ह-इन पार्टनर’ श्रद्धा वालकर (Shraddha Walkar) हिची हत्या करून तिच्या शरीराचे तुकडे केल्याप्रकरणी आरोपी आफताब अमीन पूनावाला (Aftab Poonawala) याच्याविरोधात पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे. यामध्ये आणखी डिजिटल व फॉरेन्सिक पुरावे जोडण्यात आले असल्याचे न्यायालयातील सूत्रांनी सांगितले.
मे 2022 मध्ये श्रद्धाचा गळा दाबून हत्या केल्याचा व तिच्या शरीराचे तुकडे करून ते शहराच्या वेगवेगळ्या भागांत फेकून दिल्याचा पूनावालावर आरोप आहे. त्याच्यावर भारतीय दंड संहितेच्या 302 (हत्या) आणि 201 (पुरावे नष्ट करणे) या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूनावालाविरोधात शहर न्यायदंडाधिकारी अविरल शुक्ला यांच्यापुढे सुमारे तीन हजार पानांचे पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आले.
यामध्ये प्रामुख्याने गुगल लोकेशन्स, सर्च हिस्ट्री आणि इतर डिजिटल आणि फॉरेन्सिक पुराव्यांचा समावेश आहे. या पुराव्यांतून पूनावालावरील आरोपांची अधिक स्पष्टतेने पुष्टी होते, असा दावा शहर पोलिसांनी केला आहे. याआधी मागील वर्षी जानेवारी महिन्यात पूनावालाविरोधात सहा हजार 629 पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले होते.