सौजन्य - नवराष्ट्र टीम
वाद विवाद झाल्यानंतर तरुणाने एकाची दुचाकी पेटवून दिली. त्या दुचाकीने पेट घेतल्याने झोपड्यांना आग लागली असल्याचे समोर आले आहे. समर्थ तुपे (वय २०, रा. हडपसर) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पुणे-सोलापूर रस्त्यावर राम मनोहर लोहिया उद्यान आहे. उद्यानाच्या मागील बाजूस मजुरांची वसाहत आहे. वसाहतीतील एका झोपडीला शनिवारी पहाटे अडीचच्या सुमारास आग लागली होती. झोपड्या तात्पुरत्या स्वरूपात बांबू आणि पत्र्याचा वापर करून बांधलेल्या आहेत. गृहोपयोगी साहित्याने पेट घेतल्यानंतर आग भडकली. आग भडकल्यानंतर शेजारी असलेल्या झोपड्यांनी पेट घेतला. आग लागल्यानंतर वसाहतीतील मजूर आणि कुटुंबीय बाहेर पडले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाने घटनास्थळ धाव घेऊन प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली.
पोलिसांनी परिसरातील रहिवाशांची चौकशी केली. तेव्हा वसाहतीला आग ही दुर्घटना नसून, वसाहतील तरुणाशी वाद झाल्याने लावली गेल्याचे समोर आले. त्याने त्याची दुचाकी पेटवून दिली. त्या दुचाकीने पेट घेतला. नंतर शेजारी असलेल्या झोपड्यांना आग लागली, अशी माहिती चौकशीत मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने तपास करुन आरोपी समर्थ तुपे याला ताब्यात घेतले.
तुपे याची चौकशी करण्यात आली. तेव्हा त्याचा वसाहतीतील एका तरुणाशी वाद झाला होता. वादातून त्याने दुचाकी पेटवून दिली. त्यानंतर या दुचाकीची झळ शेजारी असलेल्या दोन दुचाकींना पोहोचली. आग भडकल्यानंतर त्याची झळ झोपड्यांना बसली. नंतर एकापाठोपाठ झोपड्यांनी पेट घेतला. ‘पोलिसांनी या प्रकरणी तुपेला ताब्यात घेऊन त्याच्यावर भारतीय न्यायसंहिता ३२६ अन्वये ( जाणीवपूर्वक आग लावून देणे) गुन्हा दाखल करण्यात आला आहे’, अशी माहिती पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी दिली.






