मोदी सरकारचे रेल्वे विभागाला बंपर गिफ्स; लक्षद्वीपसाठी खास तरतूद

सरकार सामान्य गाड्यांच्या बोगी बदलून वंदे भारत सारख्या बोगी तयार करणार आहेत. याशिवाय मेट्रो आणि नमो रेलचा विस्तार इतर शहरांमध्येही करण्यात येणार आहे.

    दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या टर्मचे शेवटचा अर्थसंकल्प (Budget 2024) सादर केला. 2024-25 सालाचा अंतरिम बजेट सादर करताना रेल्वे विभागासाठी (Railway Division) मोठ्या घोषणा केल्या आहेत. यामुळे प्रवाशांची सुखसोय अधिक चांगली होण्यास मदत होणार आहे. सरकार सामान्य गाड्यांच्या बोगी बदलून वंदे भारत (Vande Bharat Railway) सारख्या बोगी तयार करणार आहेत. याशिवाय मेट्रो आणि नमो रेलचा (Namo Rail) विस्तार इतर शहरांमध्येही करण्यात येणार आहे.

    बजेटची घोषणा करताना अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या, सुमारे 40 हजार रेल्वे बोगींचे वंदे भारत बोगीत रूपांतर केले जाणार आहे. याबरोबरच सरकारने 3 नवीन रेल्वे कॉरिडॉर बांधण्याची घोषणा केली असून, फ्रेट कॉरिडॉरचे कामही सुरू आहे. गेल्या दहा वर्षांत देशातील विमानतळांची संख्याही वाढल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. सध्या देशात 149 विमानतळे कार्यरत आहेत. अशी माहिती देखील सीतारमण यांनी दिली आहे.

    पुढे त्या म्हणाल्या , रेल्वे विभागामध्ये तीन मुख्य कॉरिडॉर तयार करण्यात येतील. या तीन मुख्य कॉरिडॉरमध्ये ऊर्जा, खनिज आणि सिमेंट कॉरिडॉर, पोर्ट कनेक्टिव्हिटी कॉरिडॉर आणि हाय ट्रॅफिक डेन्सिटी कॉरिडॉर यांचा समावेश आहे. हे नवीन कॉरिडॉर पीएम गती शक्ती उपक्रमांतर्गत ओळखले जाणार आहेत. याशिवाय हाय ट्रॅफिक डेन्सिटी कॉरिडॉर जलद आणि सुरक्षित रेल्वे प्रवास सुनिश्चित करण्यात मदत करतील, असे देखील केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी स्पष्ट केले आहे.

    मागील अनेक दिवसांपासून भारताचे मालदीवसोबत तणावपूर्ण संबंध निर्माण झाले आहेत. याचा मोठा फटका मालदीवला बसत असताना आता अर्थसंकल्पामध्ये लक्षद्वीपसाठी खास तरतूद करण्यात आली आहे. मोदी सरकारकडून अर्थसंकल्पात लक्षद्वीपसह अनेक बेटांवर पर्यटनासाठी नवीन प्रकल्प जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती अर्थमंत्र्यांनी दिली आहे. विशेष म्हणजे मालदीव सरकारच्या मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीनंतर सोशल मीडियावर मालदीवच्या पर्यटनावर बहिष्कार टाकण्यात आला होता. यानंतर भारतीय नागरिक मोठ्या संख्येने लक्षद्वीपला पोहोचू लागले आहे.