फोटो सौजन्य - Social Media
राज्यात चर्चेत असलेल्या ‘द महाराष्ट्र फाईल’ या चित्रपटावरून नव्या वादाला तोंड फुटले आहे. चित्रपटात कथितपणे ‘छोटा मराठा’ हा शब्दप्रयोग वापरण्यात आल्याचा आरोप करत मराठा क्रांती मोर्चाने तीव्र आक्षेप नोंदवला असून, या संदर्भात सेन्सॉर बोर्ड आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली आहे. संबंधित संवाद हटवून चित्रपटाचे पुनर्परीक्षण करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांच्या मते, मराठा समाज हा महाराष्ट्राच्या इतिहास, संस्कृती आणि सामाजिक जीवनाचा महत्त्वाचा घटक असून अशा प्रकारचा शब्दप्रयोग समाजाच्या भावना दुखावणारा आणि प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणारा आहे. त्यामुळे अशा संवादांना परवानगी कशी मिळाली, याबाबत केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.
निर्माता-दिग्दर्शक संजीव कुमार राठोड यांच्या या चित्रपटाची प्रदर्शना आधीपासूनच मोठी चर्चा होती. प्रशासकीय व्यवस्था आणि सामाजिक विषयांवर भाष्य करणाऱ्या या चित्रपटाला काही प्रेक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला असला, तरी काही संघटनांनी विशिष्ट संदर्भांवर आक्षेप घेतला आहे. त्यामुळे चित्रपटाभोवतीचा वाद अधिक गडद होताना दिसत आहे.
दरम्यान, मराठा क्रांती मोर्चाच्या काही पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाने योग्य दखल न घेतल्यास राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. काही व्यक्तींनी चित्रपट प्रदर्शित करणाऱ्या चित्रपटगृहांविरोधात आक्रमक भूमिका घेतल्याचेही समोर आले आहे. अशा विधानांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
या प्रकरणावर अद्याप चित्रपटाचे निर्माता-दिग्दर्शक संजीव कुमार राठोड यांची अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. त्यामुळे तक्रारींवर निर्मिती संस्थेकडून काय स्पष्टीकरण दिले जाते आणि प्रशासन किंवा सेन्सॉर बोर्ड पुढे कोणती भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, अखिल भारतीय बंजारा समाजातील काही प्रतिनिधींनीही चित्रपटाबाबत नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर आली असून, या वादाची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.






