एपीएमसी पोलिसांची धडक कारवाई; वेश्याव्यवसायाविरोधात मोहीम, अतिक्रमणावरही संयुक्त कारवाई
सावन वैश्य | नवी मुंबई : एपीएमसी पोलीस ठाण्याचे नवनियुक्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अवैध धंद्यांविरोधात धडक कारवाईची मोहीम सुरू केली आहे. पदभार स्वीकारल्याच दिवशी एमएच-४३ बारवर कारवाई केल्यानंतर आता जनता मार्केट परिसरात सुरू असलेल्या कथित वेश्याव्यवसायाविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एपीएमसी पोलिसांनी जनता मार्केट परिसरात छापा टाकून वेश्याव्यवसायात सहभागी असल्याचा संशय असलेल्या पाच ते सहा महिलांना ताब्यात घेतले. या प्रकरणी पुढील चौकशी सुरू असून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.
एपीएमसी पोलीस ठाण्यात यापूर्वीही अशा प्रकारच्या कारवाया होत होत्या. मात्र, नवनियुक्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध धंद्यांवर अधिक कठोर आणि सातत्यपूर्ण कारवाई केली जात असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, शहरातील संवेदनशील भागांमध्ये पोलिसांकडून विशेष लक्ष ठेवण्यात येणार असून काही ठिकाणी ‘फिक्स पॉईंट’च्या माध्यमातून पोलिसांची करडी नजर राहणार आहे.
दरम्यान, वेश्याव्यवसायाविरोधातील कारवाईसोबतच जनता मार्केट परिसरातील अनधिकृत स्टॉल्स आणि अतिक्रमणाविरोधातही संयुक्त मोहीम राबविण्यात आली. तुर्भे विभाग आणि एपीएमसी पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करत अनेक अनधिकृत उभारणींवर कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे.
नवीन वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या आगमनानंतर कायदा व सुव्यवस्थेसंदर्भातील कामकाजाला अधिक गती मिळाल्याचे स्थानिकांकडून सांगितले जात आहे. याच पार्श्वभूमीवर जनता मार्केट परिसरातील काही लॉज आणि संशयित ठिकाणांची तपासणी वाढविण्यात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अवैध धंदे, अतिक्रमण आणि कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या घटकांविरोधात पुढील काळातही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.






