गोरखपुर : कर्नाटकातील यशवंतपूर येथून येणारी ट्रेन गोरखपूरच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 7 वर जेव्हा आली तेव्हा गोरखपूर रेल्वे स्थानकावर एकच गोंधळ उडाला. रेल्वे प्रशासन, सुरक्षा दल आणि डॉक्टरांचे पथकही घाईघाईत तेथे पोहोचले. त्याचं झालं असं की, ट्रेनमधील काही प्रवाशांनी बिर्याणी आणि अंडा करी खाल्ली होती. त्यामुळे सुमारे 50 प्रवाशांची तब्येत बिघडली.
यशवंतपूर-गोरखपूर सुपरफास्ट ट्रेनमध्ये ही घटना घडली. या रेल्वेतील प्रवाशांनी धावणाऱ्या विक्रेत्यांकडून बिर्याणी आणि अंडी करी विकत घेऊन खाल्ली होती. या प्रवाशांनी हे पदार्थ रेल्वेतच घेतले होते. मिळालेल्या माहितीनुसार, भोपाळनंतर झांशी आणि कानपूर सेंट्रलमध्ये पोटदुखी, उलट्या, जुलाब आणि ताप अशी लक्षणे लगेचच या प्रवाशांमध्ये जाणवली.
त्यानंतर अशा प्रवाशांवर तातडीने उपचार करण्यात आले. काहींना रुग्णालयातही पाठवण्यात आले. दरम्यान, या घटनेनंतर रेल्वे प्रशासन आणि आयआरसीटीसी अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.