रशीद खान(फोटो-सोशल मीडिया)
Rashid Khan creates history in T20 cricket : अफगाणिस्तानचा कर्णधार रशीद खानने टी-२० क्रिकेटमध्ये इतिहास रचला आहे. अफगाणिस्तानच्या या दिग्गज लेग-स्पिनरने टी-२० फॉरमॅटमध्ये ७०० विकेट्सचा टप्पा गाठून विश्वविक्रम रचला आहे. टी-२० फॉरमॅटमध्ये ७०० विकेट्स घेणारा तो जगातील पहिलाच गोलंदाज ठरला आहे. युएई विरुद्धच्या टी-२० वर्ल्ड कप सामन्यात त्याने ही उल्लेखनीय कामगिरी पार पाडली. या सामन्यात त्याने मोहम्मद अरफानला बाद करून आपली ७०० वी विकेट मिळवली. यापूर्वी इतर कोणत्याही गोलंदाजाला टी-२० क्रिकेटमध्ये हा टप्पा गाठण्यात यश आले नव्हते.
हेही वाचा : AFG vs UAE : अफगाणिस्तानच्या पदरात विश्वचषकाचा पहिला विजय! यूएईला 5 विकेट्सने केले पराभूत
रशीद खान टी-२० फॉरमॅटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानी विराजमान आहे. वेस्ट इंडिजचा माजी अष्टपैलू ड्वेन ब्राव्हो ५८२ सामन्यांमध्ये ६३१ विकेट्ससह दुसऱ्या स्थानी आहे. त्याचा देशबांधव सुनील नारायण ५८३ सामन्यांमध्ये ६१३ विकेट्ससह तिसऱ्या स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी फिरकी गोलंदाज इम्रान ताहिर ५७२ विकेट्ससह चौथ्या स्थानी आहे. या यादीत वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेल ५०८ विकेट्ससह पाचव्या क्रमांकावर विराजमान आहे. हे सर्व खेळाडू टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाले असल्याने रशिदचा विक्रम मोडणे अत्यंत कठीण मानले जात आहे.
रशिद खानने २०१५ मध्ये टी२० मध्ये पदार्पण केले केले होते. आजपर्यंत, त्याने ५१८ सामन्यांमध्ये ५१३ डावांमध्ये १८.५ च्या सरासरीने आणि ६.५९ च्या इकॉनॉमी रेटने ७०० विकेट्स चटकावल्या आहेत. या दरम्यान त्याने १८ वेळा चार विकेट्स आणि चार वेळा पाच विकेट्स घेण्याची किमया साधली आहे. त्याच्या सातत्याने प्रभावी गोलंदाजीमुळे तो या फॉरमॅटमध्ये सर्वात यशस्वी गोलंदाज बनला आहे. यासोबतच आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम देखील त्याच्या नावावर जमा आहे, त्याने आतापर्यंत १९१ विकेट्स घेतल्या आहेत.
यूएई विरुद्धच्या सामन्यात अफगाणिस्तानने शानदार प्रदर्शन केले. प्रथम फलंदाजी करताना युएईने २० षटकांत ९ गडी गमावून १६० धावा उभ्या केल्या. सोहेब खानने ४८ चेंडूत ६८ धावा आणि शराफूने ३१ चेंडूत ४० धावांचे योगदान दिले. लक्ष्याचा पाठलाग करताना अफगाणिस्तानने १९.२ षटकांत ५ गडी गमावून विजय मिळवला. सामन्यात उत्कृष्ट अष्टपैलू कामगिरीसाठी अझमतुल्लाह उमरझाईला सामनावीर म्हणून सन्मानित करण्यात आले.






