जबलपूर : जिल्हाधिकारी कार्यालयात गुरूवारी दुपारपासून ते संध्याकाळपर्यंत तापलेलं वातावरण होतं. एका प्रेमीयुगुलाच्या लग्नावरुन वातावरणात (Intercaste Marriage) तणाव स्पष्ट जाणवत होता. या लग्नाला दोघांच्याही घरातून विरोध होता, कारण लग्न आंतरधर्मीय होतं. त्यामुळं दोन्ही बाजूंकडून वर आणि वधुचे कुटुंबीय एकमेकांच्या समोर उभे ठाकले होते. वादाची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात (Jabalpur Marriage) पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या पहाऱ्यात कोर्टात या तरुणीचा विवाह तरुणाशी करुन देण्यात आला.
प्रेमासाठी मुस्लिम मुलगी झाली हिंदू
विवाह झाल्यानंतर पोलिसांच्या सुरक्षेतच या वधू-वरांना जिल्हाधिकारी कार्यालयातून नेण्यात आलं. जबलपूरच्या नव्या मोहल्ल्यात राहणारी मुविना खान आणि गौरखपूरमध्ये राहणारा आयु। केवट हे एकमेकांच्या प्रेमात होते. दोघांची एकमेकांशी लग्न करण्याची इच्छा होती. मात्र, धर्म वेगवेगळे असल्यानं घरातून विरोध होत होता. हिंदू तरुणाचे कुटुंबीय काही काळानं लग्नासाठी तयार झाले. मात्र, मुस्लीम असलेल्या मुलीकडचे कुटुंबीय ऐकण्यास तयार नव्हते. विरोध लक्षात घेता कोर्ट मॅरेज करण्याच्या निर्णयापर्यंत दोघेही आले.
कोर्टात हिंदू-मुस्लिम आमनेसामने
लग्न करण्यासाठी त्यांनी कोर्टात अर्ज दाखल केला. लग्नासाठी गुरुवारी हे दोघंही वर-वधू कोर्टात पोहचले. त्यावेळी मुस्लीम मुलीचे नातेवाईकही कोर्टात जमा झाले. याच सगळ्यात या लग्नाची माहिती हिंदुत्ववादी संघटनांही मिळाली होती. या हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्तेही कोर्टात दाखल झाले. पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात असल्यानं कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. विवाहानंतर पोलिसांच्या सुरक्षेत या नवविवाहितांना सासरी पोलीस बंदोबस्तात पाठवण्यात आलं.






