कोरोनाने पुन्हा सर्वांच्या चिंतेत वाढ केली आहे. देशामध्ये कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलं असून रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. अशामध्ये कोरोनामुळे साऊथ फिल्म अभिनेता आणि डीएमडीके नेता विजयकांत यांचे निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. कोरोनामुळे अभिनेत्याचा मृत्यू झाल्यामुळे साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये खळबळ उडाली आहे. सध्या सोशल मीडियावर पोस्ट करत विजयकांत यांचे चाहते, सेलिब्रिटी आणि पक्षाचे कार्यकर्ते श्रद्धांजली वाहत आहेत.
विजयकांत कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. श्वास घ्यायला त्रास होत असल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. MIOT रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. विजयकांत यांच्या निधनानंतर रुग्णालयाबाहेर सुरक्षा वाढविण्यात आली आहे.
कोण आहेत विजयकांत ?
तामिळनाडूच्या राजकारणातील एक महत्वाचा चेहरा म्हणजे विजयकांत. ते DMDK पक्षाचे संस्थापक सदस्य आणि विद्यमान अध्यक्ष होते. 2011 ते 2016 दरम्यान विरोधी पक्षनेते पदावर त्यांनी काम केलं आहे. तसेच टॉलिवूडमधील ते एक लोकप्रिय अभिनेते आहेत. 154 सिनेमांत त्यांनी काम केलं आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे 20 नोव्हेंबर रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आज सकाळी त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली.
विजयकांत यांनी 154 सिनेमांत आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. चेन्नईत विजयकांत यांचं एक इंजीनियरिंग कॉलेज आणि कोयम्बेडु नावाचा लग्नाचा हॉल आहे. अभिनेते असण्यासोबत ते निर्माता आणि दिग्दर्शकही होते. विरुधाचलम आणि ऋषिवंदियम या मतदारसंघाचं त्यांनी प्रतिनिधित्व केलं आहे.






