नवी दिल्ली : महागाई सध्या खूप वाढताना दिसत आहे. एकिकडे किरकोळ बाजारातील (Retail Market Inflation) महागाईचा दर हा वाढतच चालला आहे तर दुसरीकडे होलसेल बाजारातही महागाईनं (Wholesale Market) उच्चांक गाठला आहे. फेब्रुवारी महिन्याच्या तुलनेत मार्च महिन्यात होलसेल बाजारातील महागाईचा दर हा दीड टक्क्यांपेक्षा जास्तीनं वाढलेला आहे. फेब्रुवारीत होलसेल बाजारातील महागाई दर (Inflation Rate) हा १३.११ टक्के इतका होता. मात्र मार्च महिन्यामध्ये या दरात लक्षणीय वाढ झाली. मार्च महिन्यात होलसेल बाजारातील महागाई दर हा तब्बल १४.५५ टक्क्यांवर पोहोचला आहे. तर जानेवारी महिन्यामध्ये हाच दर १२.९६ टक्के इतका होता. होलसेल बाजारातील महागाई दर वाढणं ही चिंताजनक बाब मानली जाते आहे. कारण याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या दैनंदिन जगण्यावर होणार आहे. होलसेल बाजारीत वस्तूचे दर महागले, तर किरकोळ बाजारातील वस्तूंच्या किमती थेट महागणार आहेत. त्यामुळे याचा थेट परिणाम सामान्यांच्या बजेटवर होताना पाहायला मिळणार आहे.
[read_also content=”भाजप नगरसेवक धीरज घाटे यांच्या सुरक्षेसाठी असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यास हनुमान जयंतीत मारहाण https://www.navarashtra.com/maharashtra/bjp-corporator-dheeraj-ghate-security-guard-beaten-in-hanuman-jayanti-festival-in-pune-nrka-270475.html”]
पहिल्या तीन महिन्यात महागाईनं बेहाल करणारी आकडेवारी समोर आली आहे. या आकडेवारीनुसार जानेवारी ते मार्च या दरम्यान, कशापद्धतीनं होलसेल बाजारातील महागाई वाढत गेली आहे, हे अधोरेखित होत आहे. तसेच आता वाढलेली महागाई पुन्हा नियंत्रणात कशी आणायची असा प्रश्न उभा ठाकला आहे.
महिन्याची आकडेवारी पाहिली, तर होलसेल बाजारात खाण्यापिण्याच्या वस्तूंचे दर हे ८.४७ वरुन ८.७१ वर जाऊन पोहोचले आहे. इंधन आणि उर्जा क्षेत्रात ३१. ५० टक्क्यांवरुन थेट ३४.५२ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे.
बटाट्यांचे दर हे बाजारात कमालीचे वाढले आहेत. १४.७८ वरुन २४.६२ इतकी जबरदस्त वाढ बटाट्यांच्या किमतीवर दिसून आली आहे. तर दुसरीकडे कांद्याच्या दरातही वाढ नोंदवण्यात आली आहे. दरम्यान, मांसाहार करणाऱ्यांसाठीही दिलासादायक वृत्त नाही. अंडी, मांस यांच्या किमतीही वाढल्याच आहेत.
कच्च्या तेलाच्या किमतीसह सगळ्यावरच परिणाम करत असून वेगानं महागाईचा दर वाढत आहे. कमोडिटी इंडेक्स WPI नुसार २.६९ इतकी वाढ नोंदवण्यात आली आहे. तर भाज्यांच्या होलसेल बाजारातील दरात घट नोंदवण्यात आली आहे. २६.९३ वरुन १९.८८ इतका दर भाज्यांच्या होलसेल बाजारात नोंदवला गेला आहे.
दरम्यान, याआधीच किरकोळ बाजारातही उच्चांकी दर पाहायला मिळालेला आहे. जवळपास सात टक्क्यांच्या जवळ किरकोळ महागाईचा दर पोहोला आहे. त्यामुळे आता ही महागाई नियंत्रित कशी करायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे. चार टक्के किरकोळ महागाईचा दर ठेवण्याचं आरबीआयचं ध्येय आहे. मात्र हा दर आवाक्यात येण्याऐवजी वाढतच चालल्यानं सगळ्यांच गोष्टींवर ताण पडत आहे. सर्वसामान्य माणसासाठी त्यामुळे जगायचं कसं, असा प्रश्नही निर्माण होऊ लागला आहे. सध्या किरकोळ बाजारातील महागाईचा दर हा ६.९५ टक्के इतका आहे.