वाहनांमुळे वन्यप्राण्यांचे अस्तित्व धोक्यात! चपराळा अभयारण्यातील राष्ट्रीय महामार्गावर चितळ जागीच ठार
राष्ट्रीय महामार्ग ३५३सी आलापल्ली-आष्टी या धोकादायक मार्गावर भरधाव वाहनाच्या धडकेत चपराळा अभयारण्यातील एका मादी चितळाचा जागीच मृत्यू झाला. वन नाक्यापासून अल्पअंतरावर ही घटना घडल्याने वन्यप्रेमींत तीव्र हळहळ व्यक्त होत आहे. अभयारण्यात आढळणाऱ्या दुर्मिळ वन्यजीवांचे अस्तित्व आता या मार्गावरील अतिवेगाने धावणाऱ्या अवजड वाहनांमुळे गंभीर धोक्यात आले आहे.(फोटो सौजन्य – istock)
घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला तसेच पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शवविच्छेदन करण्यात आले. ही घटना लगाम ते चौडमपल्लीदरम्यान आष्टीकडे जाणाऱ्या डांबरी मार्गावर, वनविभागाच्या नाक्यापासून अल्प अंतरावर घडली. हा परिसर चपराळा अभयारण्य अंतर्गत येतो. अभयारण्य क्षेत्रात वाहनांसाठी वेगमर्यादा निश्चित करण्यात आलेली असतानाही अनेक वाहने नियमांकडे दुर्लक्ष करून अतिवेगाने धावत असल्याचे दिसून येते. वेगमर्यादा उल्लंघन करणाऱ्यांवर प्रभावी कारवाई होत नसल्याने वन्यप्राण्यांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे.
चपराळा अभयारण्यात हरीण, चितळ, सांबर, अस्वल, रानकुत्रे, बिबट, वानर तसेच विविध प्रकारचे पक्षी मोठ्या प्रमाणात आढळतात. लगाम नाक्यापासून आष्टीपर्यंत सुमारे १८ किलोमीटरचा ३५३सी हा महामार्ग अभयारण्याच्या हद्दीतून जातो. या परिसरात वन्यप्राणी मुक्तपणे संचार करीत असल्याने ते वारंवार रस्ता ओलांडतात. गेल्या पाच-सहा वर्षांत या मार्गावरील वाहनांची संख्या लक्षणीय वाढल्याने अपघातांच्या घटना वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
गडचिरोली जिल्ह्यात चपराळा, भामरागड, प्राणहिता आणि आता नव्याने कोलामाको अभयारण्य देखील होऊ घातला आहे. या अभयारण्यातून अत्यंत दुर्मिळ असे वन्यप्राण्यांचे संगोपन केले जात आहे. या अभयारण्यातून राष्ट्रीय महामार्ग गेला आहे. मात्र या महामार्गावर अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांचा बचाव करायला असेल तर संबंधित विभागाकडून वन्यजीव ओलांडणी पूल, रिफ्लेक्टर, अतिरिक्त गस्त, कडक स्पीड कंट्रोल आवश्यक आहे.






