सिस्टम फेल्युअर की मानवी चूक... सर्व 34 ड्रीमलाइनर विमानांची तपासणी होणार : राम मोहन नायडू
अहमदाबादमध्ये 12 जून रोजी झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघाताने देशाला हादरवून सोडलं आहे. या अपघातात २७५ जणांचा मृत्यू झाला. अपघात अत्यंत गांभीर्याने घेतला असून तातडीने उच्चस्तरीय चौकशी सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती नागरिक उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांनी दिली. आज दिल्लीत DGCA मुख्यालयात पत्रकार परिषद ते बोलत होते.
Ahmedabad Plane Crash: कोणत्या कारणांमुळे क्रॅश झाले Air India चे विमान? येत्या 3 महिन्यांत…
एअर इंडिया कंपनीची ही नियोजित AI-171 फ्लाईट होती. यामध्ये एकूण 242 प्रवासी होते. हे विमान दुपारी 1:39 वाजता अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण करताच काही सेकंदातच, 650 फूट उंचीवर असताना, अचानक खाली यायला लागलं. त्या क्षणी पायलटने “मेडे कॉल” (आपात स्थिती संकेत) दिला आणि नंतर विमानाचा ATC (एअर ट्रॅफिक कंट्रोल) शी संपर्क तुटला.
फ्लाईट केवळ 2 किमी अंतरावर असलेल्या मेधानीनगर भागात कोसळली. या विमानाचे पायलट कॅप्टन सुमित सभरवाल आणि क्लाइव सुन्दर होते. विमानाने याआधी पॅरिस ते दिल्ली आणि नंतर दिल्ली ते अहमदाबाद असा प्रवास केला होता.
राम मोहन नायडू यांनी सांगितले की विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला असून Air Accident Investigation Bureau (AAIB) त्याचा अभ्यास करत आहे. गृह सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक स्वतंत्र उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे, ज्यात केंद्र व राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी असतील. ही समिती फक्त अपघाताची चौकशीच करणार नाही, तर देशातील विमान सुरक्षा पुन्हा मजबूत कशी होईल, यावरही शिफारसी करणार आहे.
मंत्री नायडू यांनी स्पष्ट केलं की भारतात सध्या 34 बोईंग 787 ड्रीमलाइनर विमानं कार्यरत आहेत. ही दुर्घटना या मालिकेतील पहिली मोठी दुर्घटना असल्यामुळे DGCA ला सर्व 34 विमानांची विस्तृत तपासणी (extended surveillance) करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
पत्रकार परिषदेत बोलताना नायडू म्हणाले, “मी स्वत: अपघातात माझे वडील गमावले आहेत, त्यामुळे या वेदना मी समजू शकतो. मंत्रालयाकडून अपघातानंतरचे सर्व प्रोटोकॉल पाळण्यात आले आहेत. सुरक्षा बाबतीत कुठलीही तडजोड केली जाणार नाही. गरज असेल, तर तात्काळ बदल करण्यात येतील.”
सदरील उच्चस्तरीय समिती 3 महिनेात आपला अहवाल सादर करणार असून, खालील 3 मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केलं जाईल:
1. अपघातामागील संभाव्य तांत्रिक किंवा मानवी चूक
2. भविष्यातील विमान अपघात रोखण्यासाठी सुरक्षा उपाय
3. पीडितांच्या कुटुंबांना दिलेल्या सहाय्याची पुनरिक्षा
अहमदाबाद विमान अपघातामुळे संपूर्ण देशाला धक्का बसला आहे. यानंतर देशातील विमान वाहतुकीच्या सुरक्षेचा पुन्हा एकदा आढावा घेण्याची गरज अधोरेखित झाली आहे. सरकारने तातडीने पावलं उचलली असून या दुर्घटनेतील सत्य बाहेर येईपर्यंत तपास यंत्रणा पूर्ण दक्षतेने कार्यरत आहेत.