File photo : Air India
कोची : सध्या बॉम्ब असल्याचे फोन येण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसत आहे. त्यातच आता लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात बॉम्ब असल्याची धमकी मिळाली. ही धमकी मिळताच सुरक्षा यंत्रणांनी तातडीने तपासणीला सुरुवात केली. तपासणीअंती काहीही आढळले नाही. दरम्यान, याबाबतची धमकी देणाऱ्यास अटक करण्यात आली आहे.
केरळ राज्यातील कोची आंतरराष्ट्रीय विमानतळावर हा सर्व प्रकार घडला. याबाबतची माहिती विमानतळाच्या अधिकाऱ्याने दिली. बॉम्ब असल्याचा फोन आल्यानंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी विमानाची संपूर्ण तपासणी केली आणि त्यांना कोणताही धोका आढळला नाही. त्यामुळे उड्डाण ठरल्याप्रमाणे झाले.
मध्यरात्री 1.22 च्या दरम्यान एअर इंडिया आणि कोची इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडला तातडीने ही माहिती देण्यात आली. त्यानंतर विमानतळ सुरक्षा गट, एअरलाईन सुरक्षा कर्मचारी आणि बॅगेज चेक सिस्टिमद्वारे सखोल सुरक्षा तपासणी करण्यात आली.
यानंतर मुंबईतील कॉल सेंटरवर धमकीचे कॉल करणाऱ्या व्यक्तीची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू झाले. हा कॉल मलप्पुरम जिल्ह्यातील कोंडोट्टी येथील रहिवासी सुहैब याने केला होता.