मुंबईहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान माघारी परतले; नेमकं झालं काय?
Air India Plane Crash: मुंबईहून लंडनच्या दिशेने निघालेले एअर इंडियाचे विमान एआय-१२९ हे उड्डाणानंतर काही वेळातच मुंबईकडे परतल्याची माहिती समोर आली आहे. ‘फ्लाईटराडार२४’ या प्लॅटफॉर्मवरून मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी हे विमान नियमित वेळेनुसार लंडनसाठी रवाना झाले होते. मात्र, काही कारणास्तव ते परतीच्या मार्गावर आहे.
संबंधित विमान नेमके माघारी का परतले, याबाबत एअर इंडियाने अथवा संबंधित अधिकाऱ्यांनी अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. तांत्रिक बिघाड, वैमानिकांच्या सूचनांनुसार घेतलेला निर्णय, किंवा अन्य कोणताही धोका यामागे असू शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान, गुरुवारी अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान AI-171 टेकऑफनंतर काही सेकंदात कोसळले. या भीषण अपघातात २६५ जणांचा मृत्यू झाल्याची दु:खद घटना ताजी असतानाच मुंबईतील विमानाच्या परतीमुळे चिंता आणि चर्चा वाढली आहे.
अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या विमानाच्या भीषण अपघातानंतर एअर इंडियाने सावधगिरीचा उपाय म्हणून काही उड्डाणे वळवण्याचा किंवा मूळ स्थानकांकडे परत पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत हा निर्णय घेतल्याचे एअर इंडियाने स्पष्ट केले आहे. यानुसार, काही विमानांचे मार्ग वळवण्यात आले आहेत. तर काही विमानांना उड्डाणानंतर पुन्हा मूळ विमानतळावर परत पाठवण्यात आले आहे. दरम्यान, आज सकाळी मुंबईहून लंडनकडे निघालेले एअर इंडियाचे AI-129 हे विमानही परतीच्या मार्गावर असल्याचे फ्लाईटराडार२४वर दिसून आले.
AI130 – लंडन हीथ्रो-मुंबई – व्हिएन्ना वळवण्यात आली.
AI102 – न्यू यॉर्क-दिल्ली-शारजाह वळवण्यात आली.
AI116 – न्यू यॉर्क-मुंबई-जेद्दाह वळवण्यात आली.
AI2018 – लंडन हीथ्रो-दिल्ली-मुंबई वळवण्यात आली.
AI129 – मुंबई-लंडन हीथ्रो – मुंबईला परतणे
AI119 – मुंबई-न्यू यॉर्क – मुंबईला परतणे
AI103 – दिल्ली-वॉशिंग्टन – दिल्लीला परत येत आहे.
AI106 – नेवार्क-दिल्ली – दिल्लीला परतणे
AI188 – व्हँकूवर-दिल्ली-जेद्दाह वळवण्यात येत आहे
AI101 – दिल्ली-न्यू यॉर्क – फ्रँकफर्ट/मिलान ही विमानसेवा वळवली जात आहे.
AI126 – शिकागो-दिल्ली-जेद्दाह मार्गे वळवण्यात येत आहे.
AI132 – लंडन हीथ्रो-बेंगळुरू – शारजाहला वळवले.
AI2016 – लंडन हीथ्रो-दिल्ली – व्हिएन्नाकडे वळवले
AI104 – वॉशिंग्टन-दिल्ली – व्हिएन्नाकडे वळवले.
AI190 – टोरोंटो-दिल्ली – फ्रँकफर्टकडे वळवले.
AI189 – दिल्ली-टोरंटो – दिल्लीला परत