चंदीगड : खलिस्तान समर्थक आणि ‘वारिस पंजाब दे’चा प्रमुख अमृतपाल सिंग (Amritpal Singh) हा गेल्या काही दिवसांपासून फरार आहे. मागील महिन्यापासून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पण आता अमृतपाल याची पत्नी किरणदीपला (Kirandeep) गुरुवारी अमृतसर विमानतळावर इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी रोखले. किरणदीप ही लंडनला जाण्याच्या तयारीत होती. त्याचवेळी श्री गुरु रामदास जी इंटरनॅशनल विमानतळावरील (Sri Guru Ram Dass Jee International Airport) अधिकाऱ्यांनी तिला चौकशीसाठी ताब्यात घेतले.
अमृतपाल सिंग याचा पोलीस गेल्या महिन्यापासून शोध घेत आहेत. पण तो अद्यापही फरार आहे. अमृतपालची पत्नी किरणदीपला इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी विमानतळावरच रोखलं आहे. सध्या तिची चौकशी सुरु करण्यात आली आहे. अमृतपाल सिंग हा 18 मार्चपासून फरार आहे. त्याच्यावर ‘एनएसए’अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरणदीप ही अनिवासी भारतीय आहे. तिच्यावरही ब्रिटनमधील बब्बर खालसाशी संबंध असल्याचा व फंडिंगचा आरोप आहे. मात्र, किरणदीपने हे आरोप फेटाळले आहेत. भारतात येण्याच्या प्रश्नावर ती म्हणाली की, मी भारतात कायदेशीरपणे राहत आहे. मी येथे 180 दिवस राहू शकते, असे म्हटले आहे.
इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी घेतलं ताब्यात
‘लूक आऊट सर्क्युलर’ सुरु असल्याने इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी तिला भारतातून जाण्यास परवानगी न देता ताब्यात घेतलं. सकाळी 11.40 वाजता अमृतसर एअरपोर्टवर ती पोहोचली होती. किरणदीपचे विमान दुपारी एक वाजता होते. ती ब्रिटनला रवाना होणार होती. परंतु, तपासणीमध्ये पकडल्याने ती पुढे जाऊ शकली नाही.
10 फेब्रुवारीला केलं होतं लग्न
अमृतपालने दुबईहून पंजाबला परतल्यानंतर गेल्या 10 फेब्रुवारी महिन्यात जल्लूपूर खेडा गावात किरणदीप कौरशी लग्न केले होते. हा सोहळा पूर्णतः गुप्त ठेवण्यात आला होता. किरणदीप कौर ब्रिटीश नागरिक असून, ती जालंधरच्या कुलारां गावची आहे. काही वर्षांपूर्वी तिचे कुटुंबीय ब्रिटनमध्ये स्थायिक झाले होते. तेव्हापासूनच ती एनआरआय झाली.