File Photo : Road Transport
नवी दिल्ली : केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. रस्ते अपघातात जखमी झालेल्यांना कॅशलेस उपचार मिळू शकणार आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कॅशलेस उपचार योजनेची घोषणा केली. याअंतर्गत अपघातग्रस्तांच्या सात दिवसांच्या उपचारासाठी दीड लाख रुपयांचा खर्च सरकार उचलणार आहे. अपघातानंतर 24 तासांच्या आत पोलिसांना माहिती दिल्यास उपचाराचा खर्च सरकार उचलेल, असे गडकरी म्हणाले.
यासोबतच ‘हिट अँड रन’ प्रकरणातील पीडितांच्या कुटुंबीयांना दोन लाख रुपयांपर्यंतची भरपाईही त्यांनी जाहीर केली. रस्ते अपघातात 2024 मध्ये 1.80 लाख मृत्यू झाले आहेत. रस्ते सुरक्षा ही सरकारची सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे गडकरी म्हणाले. 2024 मध्ये अंदाजे 1.80 लाख लोकांनी रस्ते अपघातात आपला जीव गमावला. त्यापैकी 30 हजार मृत्यू हेल्मेट न घातल्याने झाले आहेत. तसेच, 66 टक्के अपघात हे 18 ते 34 वयोगटातील लोकांसोबत झाले आहेत.
याशिवाय, शाळा, महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांजवळील प्रवेश आणि बाहेर पडण्याच्या मार्गावर व्यवस्था नसल्यामुळे अपघातात 10 हजार मुलांचा मृत्यू झाला. शाळांच्या ऑटो रिक्षा आणि मिनी बसेससाठी नियम करण्यात आले आहेत. ते कमी करण्याचा प्रयत्न करू असेही त्यांनी म्हटले आहे.
मंगळवारी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी भारत मंडपम येथे सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या परिवहन मंत्र्यांची बैठक घेतली. यामध्ये केंद्र आणि राज्य यांच्यातील वाहतूकविषयक धोरणे आणि सहकार्य यावर चर्चा करण्यात आली.
सहा राज्यांत पायलट प्रोजेक्ट
रस्ते अपघातात जलद उपचार मिळावेत यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने सहा राज्यांमध्ये पथदर्शी प्रकल्प म्हणून कॅशलेस उपचार योजना लागू केली होती. गडकरी म्हणाले की, आसाम, पंजाब, हरयाणा, चंदीगड, उत्तराखंड आणि पुद्दुचेरीमध्ये पथदर्शी प्रकल्प म्हणून ही योजना यशस्वी झाली आहे. आतापर्यंत या माध्यमातून २१०० लोकांचे प्राण वाचले आहेत. आता त्याची संपूर्ण देशात अंमलबजावणी होत आहे.